गुळवेलमुळे यकृत निकामी होते, ही अफवा ! – आयुष मंत्रालय

कोरोनाच्या काळात आयुर्वेदाच्या औषधांमध्ये गुळवेलचा चांगला लाभ होत असल्याचे समोर आल्याने जाणीवपूर्वक गुळवेलला अपकीर्त करण्याचे षड्यंत्र रचण्यात आले आहे का ? याचा केंद्र सरकारने शोध घेतला पाहिजे !

नवी देहली – गुळवेलमुळे यकृत निकामी होऊ शकते, अशा प्रकारचा अहवाल  ‘जर्नल ऑफ क्लिनिकल अँड एक्सपेरिमेंटल हेपेटोलॉजी’मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. एका संशोधनावर हा अहवाल आधारित आहे. यावर भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने स्पष्ट केले आहे, ‘गुळवेलमुळे यकृत निकामी होण्याचे वृत्त केवळ अफवा आहे.’ जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात दावा करण्यात आला होता की, मुंबईमध्ये गुळवेलच्या सेवनामुळे ६ लोकांचे यकृत निकामी झाले आहे.


आयुष मंत्रालयाने म्हटले की, गुळवेलचा संबंध यकृत निकामी होण्याशी लावणे हे भारताच्या पारंपरिक चिकित्सा पद्धतीविषयी भ्रम निर्माण करणारे आहे. आयुर्वेदामध्ये पूर्वीपासून गुळवेलचा वापर केला जात आला आहे. अनेक शारीरिक आजारांवर याचा लाभ होतो. जर्नलमधील अहवालामध्ये गुळवेल आणि तिच्या गुणकारी तत्त्वांचे योग्य प्रकारे विश्लेषण करण्यात आलेले नाही. संशोधन करतांना रुग्णांना देण्यात आलेल्या औषधांमध्ये गुळवेलच होते कि अन्य औषध होते, याची निश्चिती करण्याची आवश्यकता आहे. या अहवालामध्ये अनेक त्रुटी आहेत. यात बरीचशी माहिती स्पष्ट करण्यात आलेली नाही.