सोलापूर जिल्ह्यातील १९९ शाळांमध्ये मुख्याध्यापक पदे रिक्त !

कोरोना संसर्गामुळे शैक्षणिक क्षेत्राची स्थिती सुधारण्यासाठी अमूलाग्र पालट होणे आवश्यक असतांना १९९ शाळेतील मुख्याध्यापक पदे रिक्त असणे गंभीर आणि चिंताजनक आहे. ही पदे तातडीने भरण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करायला हवेत.

प्रतिकात्मक छायाचित्र

सोलापूर – शालेय शिक्षण विभागातील पदभरती बंद असल्याने जिल्ह्यातील १८७ मराठी, १ कन्नड, तर ११ उर्दू शाळा मुख्याध्यापकांविना चालू आहेत, तसेच मराठी माध्यमातील उपशिक्षकांची ५४८ पदे रिक्त असून उर्दू आणि कन्नड माध्यमातील ७९ उपशिक्षकांची पदेही भरलेली नाहीत. प्राथमिक शिक्षण विभागाने आंतरजिल्हा बदलीतून त्या रिक्त जागा भरण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे.

मे किंवा जून मध्ये आंतरजिल्हा बदलीचा प्रश्‍न मार्गी लागेल, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले होते; मात्र जुलै चालू होऊनही कार्यवाही झालेली नाही. (अनेक वेळा मंत्री घोषणा करतात; मात्र प्रत्यक्षात त्याची कार्यवाही होत नाही ! त्यामुळे मंत्र्यांनी सवंग लोकप्रियतेसाठी केवळ घोषणा न करता त्याच्या कार्यवाहीसाठीही प्रयत्न करणे आवश्यक आहे ! – संपादक)

रिक्त पदांमुळे कोरोनामुक्त गावांमध्ये ऑफलाईन शिक्षणात अडचणी !

सध्या शाळा बंद अन् ऑनलाईन शिक्षण चालू या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत; मात्र ऑनलाईन शिक्षणातून त्यांची शिक्षणाची गोडी कायम राहील, याची शाश्‍वती नाही. यासमवेत अनेक जणांकडे स्मार्ट फोन नसल्याने असे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित रहात आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी शिक्षकांच्या माध्यमातून कोरोनामुक्त गावांमध्ये गृहभेटी, झाडाखालील शाळा, समाजमंदिर, तसेच मंदिरांमध्ये ऑफलाईन वर्ग भरवून स्मार्टफोन उपलब्ध नसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे; मात्र शालेय शिक्षण विभागातील रिक्त पदांमुळे त्यासाठीही अडचणी येत आहेत.