स्त्री आणि पुरुष असा कुठलाच अहं न ठेवता एकमेकांना सन्मान देणे आवश्यक !

पुरुष स्त्रीकडे ‘आदिशक्तीचे एक रूप’ या भावाने पहात नसल्यामुळे त्यांच्याकडून स्त्रीला आदराची वागणूक न मिळणे

स्त्रीजन्माचे पुष्कळ लाभ आहेत. त्यामुळे स्त्रीजन्माला दूषणे न देता त्याविषयी स्वाभिमान बाळगायला हवा. आज पुरुष स्त्रीकडे ‘आदिशक्तीचे एक रूप’ या भावाने पहात नसल्यामुळे ते तिच्याशी आदराने आणि सन्मानाने वागत नाहीत; कारण स्त्रियांशी आदराने, सन्मानाने वागणे, बोलणे यांत त्यांना न्यूनता वाटते. पुरुषांनी पुरुषी अहं जागृत ठेवून वागणे, म्हणजे ‘पुरुषार्थाने जगणे’ असे समजले जात असल्याने आज काही धर्माचरणी पुरुष सोडले, तर सगळीकडेच पुरुषांकडून स्त्रियांना समाजात, घरामध्ये आदराची वागणूक मिळतांना दिसत नाही. स्त्रियांची छेड काढणे, त्यांना उद्देशून अश्लील बोलण्यातून, कृतीतून आणि त्यांना छळण्यातून आनंद घेण्यात अन् त्यात पुरुषार्थ गाजवण्यात आजचा पुरुष मग तो तरुण असो कि वयोवृद्ध असो, धन्यता मानतो.

स्त्री-पुरुषांनी एकमेकांचा आदर आणि सन्मान करून एकमेकांना आनंद देणे, ही ईश्वरभक्तीच असणे

खरेतर ‘मी पुरुष किंवा स्त्री आहे’, असा विचार करून अहं जोपासणे हे चुकीचे आहे. विश्वाच्या निर्मिर्तीसाठी, विश्वाचे कार्य चालवण्यासाठी ईश्वराने स्त्री आणि पुरुष यांची निर्मिती केली; पण दोघांमध्ये एकच ईश्वरी तत्त्व असते. ते एकमेकांपासून देहाने वेगळे असले, तरी त्यांचा आत्मा एकाच ईश्वरापासून बनलेला असतो. त्यामुळे स्त्री-पुरुषांनी एकमेकांचा आदर, सन्मान करणे आणि एकमेकांना आनंद देणे, हा ईश्वरभक्तीचाच प्रकार आहे. एकमेकांतील ईश्वराने दिलेल्या आत्म्याचा आदर केल्याने साधना होऊन ईश्वराची कृपा संपादन होते.

प्रत्येकच स्त्री-पुरुषाने अध्यात्मशास्त्र समजून घेतले, तर त्यांचे जीवन आनंदी होऊन जन्माचे सार्थकच होईल !

स्त्री-पुरुषांनी एकमेकांचा आदर, सन्मान करणे, म्हणजे एकमेकांच्या विचारांचा, मताचा सन्मान करणे होय. एकमेकांना नावे ठेवून, न्यून लेखून कोणतेही आध्यात्मिक कार्य होणार नाही, तर एकमेकांविषयी आदर निर्माण झाल्यास एकमेकांतील आत्म्याच्या रूपात आनंदस्वरूप अशा ईश्वराचे दर्शन घडणार आहे. प्रत्येकच स्त्री-पुरुषाने अध्यात्मशास्त्र समजून घेतले, तर त्यांचे जीवन आनंदी होऊन दोघांच्या जन्माचे सार्थकच होईल.

– एक साधिका