प्रेमळ, सूक्ष्मातील जाणीव असलेली आणि देवाची ओढ असलेली चि. आनंदी प्रकाश सुतार (वय २ वर्षे) !

प्रेमळ, सूक्ष्मातील जाणीव असलेली आणि देवाची ओढ असलेली रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची चि. आनंदी प्रकाश सुतार (वय २ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. आनंदी प्रकाश सुतार एक आहे !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना सिद्ध केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

उद्या ज्येष्ठ कृष्ण पक्ष दशमी (४.७.२०२१) या दिवशी रामनाथी आश्रमातील चि. आनंदी प्रकाश सुतार हिचा दुसरा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिची आई सौ. प्रचीती प्रकाश सुतार हिला जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

(‘वर्ष २०२० मध्ये चि. आनंदीची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होती.’ – संकलक)

चि. आनंदी सुतार

चि. आनंदी प्रकाश सुतार हिला द्वितीय वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. व्यवस्थितपणा

अ. आनंदीला खोलीत कुठेही कागद किंवा काही कचरा पडलेला दिसला, तर ती तो लगेच उचलून कचरा पेटीत टाकून येते.

आ. मी कधी तिला ‘तू खोली झाड’, असे म्हणाले, तर ती खोली झाडायचा प्रयत्न करते. ती आसंदी सरकवून केर काढून पुन्हा आसंदी जागेवर ठेवते.

श्री. प्रकाश सुतार

२. प्रेमळ

अ. आनंदीचे बाबा सेवा करून आल्यावर हात-पाय धुवायला जातात. तेव्हा आनंदी लगेच त्यांना हात-पाय पुसायला पंचा आणि त्यांचा सदरा आणून देते.

आ. सेवेच्या ठिकाणी गेल्यानंतर तिला कुणी खाऊ दिला, तर ती त्यांना इतरांनाही खाऊ द्यायला सांगते.

सौ. प्रचीती सुतार

३. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी नामजप करायला सांगितला आहे’, असे वडिलांनी सांगितल्यावर लगेच आज्ञापालन करणारी आनंदी !

२१.२.२०२१ या दिवशी सकाळी ८ वाजता सर्वांनी नामजपाला बसायचे होते. नामजपाच्या वेळी आनंदी तिच्या बाबांजवळ बसली होती. त्यांनी आनंदीला सांगितले, ‘‘परात्पर गुरु डॉक्टरांनी आपल्याला नामजप करायला सांगितला आहे. आता तूही डोळे मिटून नामजप कर.’’ तेव्हा ती डोळे मिटून नामजप करू लागली आणि नंतर झोपून गेली. तेव्हा ‘एवढ्या लहान जिवालाही नामजप करायचा आहे’, समजले. हे केवळ परात्पर गुरुदेवच करू शकतात’, असे मला वाटले.

४. सूक्ष्मातील जाणीव

अ. एकदा सौ. शिवानी पडेलकर या साधिका आमच्या खोलीत येत होत्या. येण्यापूर्वी त्या दाराच्या बाजूला उभ्या होत्या. त्या वेळी आनंदी ‘काकी आली’, असे म्हणाली. ‘तिला याविषयी कसे समजले ?’, हे मला कळले नाही.

आ. एकदा तिचे बाबा सेवेनिमित्त बाहेर गेले होते. ते ४ दिवसांनी रात्री १ वाजता परत आले. त्याच वेळी आनंदी ‘बाबा-बाबा’ असे म्हणत होती. तेव्हा तिचे बाबा अजून गाडीतून उतरत होते.

५. श्लोक ऐकायला आणि स्तोत्रे म्हणायला आवडणे

आनंदीला श्लोक ऐकायला पुष्कळ आवडते. ती स्तोत्रे म्हणते. तिला मारुतिस्तोत्र पुष्कळ आवडते. ती रामरक्षास्तोत्र म्हटल्याविना झोपत नाही.

६. देवाची ओढ

अ. आनंदीसाठी मंगळवारी आणि शुक्रवारी जगदंबेची आरती लावावी लागते. आनंदी ती आरती म्हणते.

आ. आनंदी आश्रमातील ध्यानमंदिरात गेल्यावर देवतांना नमस्कार करून विभूती लावते आणि ‘मला तीर्थ दे’, असे सांगते.

इ. ती देवासमोर कान पकडून उभी रहाते आणि देवाची क्षमा मागते.’

– सौ. प्रचीती प्रकाश सुतार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.६.२०२१)

आनंदी स्वभाव, उत्तम स्मरणशक्ती, सात्त्विक वृत्ती आदी अनेक दैवी गुण असलेली  चि. आनंदी प्रकाश सुतार !

श्रीमती गीता प्रभु

१. आनंदी

‘चि. आनंदी नावाप्रमाणे आनंदी असते.

२. उत्तम स्मरणशक्ती

तिला १ – २ वेळा शिकवलेले गाणे लगेच पाठ होते. तिला अंबामातेची आरती आणि श्रीरामाचा पाळणा पाठ आहे. ती दिवसातून बरेच वेळा आरती आणि पाळणा गुणगुणत खेळत असते.

३. अष्टावधानी

ती आमच्याशी बोलत असेल किंवा खेळत असेल, तरीही तिला तिच्या बाबांच्या गाडीचा आवाज ऐकू येतो. ती लगेच ‘बाबा आले’, असे म्हणून कपाटाच्या आड लपते.

४. सतर्कता

खोलीतून बाहेर जाण्यासाठी दाराजवळ आल्यावर ती लगेच आईला ‘मास्क’ घालण्याची आठवण करून देते.

५. प्रेमभाव

तिच्या हातात तिला आवडणारा खाऊ असला, तरी ती तो खाऊ इतरांना प्रेमाने भरवते.

६. ऐकण्याची वृत्ती

इतक्या लहान वयात आनंदीला भ्रमणभाष हाताळता येतो. तिची आई अगदी थोडा वेळा तिला भ्रमणभाष देते, तरी ती त्यासाठी हट्ट करत नाही. भ्रमणभाष हाताळण्यापूर्वी तिच्या आईने तिला प्रार्थना करायला शिकवली आहे. ती प्रार्थना करूनच भ्रमणभाष हाताळते.

७. सात्त्विक वृत्ती

तिला दोन वेण्या घातलेल्या आवडतात. ती सौ. नाईककाकूंकडून आवडीने दोन वेण्या घालून घेते. तिला कुंकू लावायला आणि केसांत गजरा माळायला आवडतो.

८. देवाची ओढ

अ. ती दिवसातून बर्‍याच वेळा हात जोडून आईने तिला शिकवलेली प्रार्थना करते.

आ. ती रडत असतांना तिला श्रीकृष्णाच्या गोष्टी सांगितल्या, तर ती लगेच रडणे थांबवून गोष्टी ऐकते.

अशा अनेक दैवी गुणांनी नटलेल्या चि. आनंदी समवेत मला रहायला मिळाले. यासाठी गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्रीमती गीता प्रभु, सनातन आश्रम, रामनाथी गोवा. (१८.६.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यू ट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक