रत्नागिरी येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. रोहिणी ताम्हनकर यांना गुरुपौर्णिमेनिमित्त अध्यात्मप्रसाराची सेवा करतांना सहसाधकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे 

‘वर्ष २०१९ मध्ये मला गुरुपौर्णिमेनिमित्त रत्नागिरी येथील अनेक साधकांसमवेत अध्यात्मप्रसाराची समष्टी सेवा करण्याची संधी मिळाली. तेव्हा मला साधकांमधून भगवंताच्या विविध गुणांचे दर्शन झाले आणि ते गुण आत्मसात करायची संधी मिळाली. आम्ही आठवड्यातून ३ दिवस सत्सेवेचे विशिष्ट ध्येय ठरवून प्रयत्न करत होतो. प्रत्येक वेळेला आमची जोडी वेगवेगळी असायची. त्यामुळे ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या विश्वमनाशी एकरूप कसे व्हायचे ?’, हे मला शिकायला मिळाले, तसेच प्रत्येक साधकाचे गुणही हेरता आले. त्यातून मला पुष्कळ आनंद मिळाला. त्या वेळी मी प्रेमाने बोलणे आणि गोड बोलणे यांतील भेद अनुभवला. पावसातून दिवसभर सेवा करून घरी आल्यावर थकल्याचा लवलेशही मला जाणवत नसे. नंतर घरातील सेवा आनंदाने करण्यासाठी मन उत्साही असे. या काळात मला सहसाधकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे देत आहे.

सौ. रोहिणी ताम्हनकर

१. ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मीनल मिलिंद खेर

१ अ. सेवेची तळमळ

‘सौ. खेर यांना घरातील सर्व कामे करून झाल्यावर दिवसभर दुकानात बसावे लागते. त्यामुळे मधल्या वेळेत त्या आमच्या समवेत अध्यात्मप्रसाराच्या सेवेला यायच्या. त्या अन्य वेळी दुकानातून दूरभाषद्वारे संपर्क करून विज्ञापने, अर्पण मिळवणे, तसेच ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार करणे अशा सेवा करायच्या.

१ आ. निरपेक्ष प्रेमामुळे समाजातील अनेकांना सनातन संस्थेशी जोडणे

सौ. खेर यांच्यात पुष्कळ प्रेमभाव आहे. त्यांनी समाजातील अनेक कुटुंबे सनातन संस्थेशी जोडली आहेत. त्या समाजातील सर्वांना निरपेक्षपणे सहकार्य करतात. मला त्यांच्याकडून ‘निरपेक्ष प्रेम कसे करायचे ?’, हे शिकायला मिळाले. आम्ही विज्ञापनदात्यांकडे जायचो आणि ‘खेरवहिनींनी पाठवले आहे’, असे सांगितल्यावर ते लगेच विज्ञापनासाठी पैसे काढून द्यायचे.

२. दुकान सांभाळून साधक घडवण्यासाठी प्रयत्न करणारे श्री. मिलिंद खेर !

श्री. मिलिंद खेर स्वतःचे दुकान सांभाळून साधना करतात. ‘येणार्‍या ग्राहकाची आवड बघून त्यांना साधना सांगतात आणि त्याला दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचायला उद्युक्त करतात. ते जिज्ञासूला स्वतःचा दैनिक ‘सनातन प्रभात’ देऊन नंतर ‘तो वाचला का ? त्यातील काय आवडले ?’, अशी चौकशी करून त्याला पुढच्या टप्प्याला नेण्यासाठी प्रयत्न करतात. ‘साधक कसा घडवायचा ?’, हे त्यांच्याकडून मला शिकायला मिळाले.

३. सौ. चेचरेकाकू आणि सौ. टापरेकाकू

३ अ. परात्पर गुरु डॉक्टरांना पाहिले नसतांनाही त्यांच्याप्रती भोळा भाव आणि श्रद्धा असणे

सौ. चेचरेकाकू आणि सौ. टापरेकाकू या दोघींनी परात्पर गुरु डॉक्टरांना पाहिलेले नाही किंवा रामनाथी आश्रमही पाहिलेला नाही. त्या अतिशय आनंदी असतात. त्यांच्याकडून मला ‘गुरूंप्रती भोळा भाव कसा हवा ?’, हे शिकायला मिळाले. त्यांची परात्पर गुरु डॉक्टरांवर दृढ श्रद्धा आहे. ‘खेरकाका-काकूंनी आम्हाला साधनेत पुढे आणले’, असे त्या कृतज्ञताभावाने सांगतात. परात्पर गुरु डॉक्टरांविषयी अनुभूती सांगतांना त्यांचे बोलणे ऐकत रहावेसे वाटते.

३ आ. समाजातील लोकांमध्ये सनातन संस्थेविषयी आपलेपणा निर्माण करणे

एकदा आम्ही ५ – ६ साधक सौ. चेचरेकाकू आणि सौ. टापरेकाकू यांच्या समवेत एका गावात सेवेसाठी गेलो होतो. तिथे सर्व जण या दोघींची वाटच पहात होते. त्यांनी ‘तुम्ही उशीर का केलात ?’, असे प्रेमाने विचारले. तिथे सनातनचे हितचिंतक ‘अर्पण’ म्हणून ताटात नारळ, तांदुळ आणि पैसे ठेवून भक्तीभावाने देत होते, तर कुणी शिधा देत होते. त्यांचा अर्पण देतांना ‘केवळ धन द्यायचे नाही’, असा भाव होता. सौ. चेचरेकाकू आणि सौ. टापरेकाकू यांनी तेथील लोकांमध्ये सनातन संस्थेविषयी आपलेपणा निर्माण केला आहे. याविषयी त्या कृतज्ञताभावाने म्हणतात, ‘‘ही सर्व परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा आहे !’’

४. तळमळीने सत्सेवा करणार्‍या सौ. स्नेहल भिडे !

या सतत उत्साही असतात. त्या अंगणवाडीमध्ये नोकरी करून उर्वरित वेळेत सत्सेवेसाठी यायच्या. त्या जिज्ञासूंना गुरुपौर्णिमा स्मरणिकेसाठी विज्ञापने देण्याचे महत्त्व सांगून ती आणण्याची सेवा करायच्या. ‘परात्पर गुरु डॉक्टरांवरील श्रद्धेमुळे मी आनंदी आहे’, असा त्यांचा भाव असतो. त्यांची शाळा घरापासून दूर आहे, तरी त्या दुपारी साडेतीन वाजता शाळेतून घरी आल्या की, लगेच आवरून सेवा करायला तत्पर असायच्या.

५. आनंदी असणार्‍या सौ. रूपाली गुरव !

सौ. गुरव नेहमी आनंदी असतात. त्या नोकरीवरून आल्या की, थेट गुरुपौर्णिमेनिमित्त प्रसाराच्या सेवेला यायच्या. त्या घरातील दैनंदिन कामे आणि सत्सेवा यांचे नियोजन छान करायच्या. त्या सगळ्यांना मनापासून साहाय्य करायच्या.

६. उच्चशिक्षित असल्याचा अहं नसणारे डॉ. मंदार भिडे !

आधुनिक वैद्य असूनही ते प्रत्येकाच्या घरी जाऊन दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करतात. त्यांना ‘आपण डॉक्टर आहोत’, याचा गर्व नाही. त्यांना कधीही साहाय्याला बोलावले, तरी ते ‘नाही’ म्हणत नाहीत.

७. नेतृत्वगुण आणि व्यापकत्व असणार्‍या सौ. शुभांगी मुळ्ये !

सौ. शुभांगी मुळ्ये यांच्यात नेतृत्वगुण आणि व्यापकत्व आहे. ‘कोणत्या साधकाची कोणती क्षमता आहे ? तो कोणती सेवा करू शकेल ?’, अशा अनेक गोष्टींचा त्यांचा अभ्यास आहे. त्या स्वतःची प्रकृती सांभाळून गुरुसेवेसाठी सतत कार्यरत असतात. ‘व्यापकत्व कसे असायला पाहिजे ?’, हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले.

८. श्रीमती वनिता घाणेकर

८ अ. ‘देव सुचवतो, तसे सांगते’, या भावाने साधना, तसेच सनातन-निर्मित सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांविषयी माहिती सांगणे

‘श्रीमती घाणेकरकाकू एका बाळाच्या अंगाला तेल लावायला जायच्या. नंतर घरातील कामे करून दुपारी ४ ते सायंकाळी ५ या वेळेत त्या आमच्या समवेत सत्सेवेसाठी यायच्या. त्यांचे शिक्षण अल्प असूनही ‘देव सुचवतो, तसे मी सांगते’, असा त्यांचा भाव असतो. त्या जेथे कामाला जातात, त्या ठिकाणी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार करणे, जिज्ञासूंना सनातनची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे महत्त्व सांगणे, अशा सेवा करतात. त्यांच्यातील भक्तीभावामुळे समाजातील व्यक्ती त्यांच्याकडून सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने आनंदाने घेतात.

८ आ. परात्पर गुरु डॉक्टरांवरील श्रद्धेच्या बळावर जीवनातील संकटांना स्थिरतेने सामोरे जाणे

त्या सतत आनंदी असतात. त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा आहे. आजपर्यंत त्यांच्यावर बरीच संकटे आली; पण त्या परात्पर गुरु डॉक्टरांवरील श्रद्धेमुळे स्थिर राहून संकटांना सामोरे गेल्या. ‘कठीण प्रसंगात स्थिर कसे रहायचे ?’, हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले.

सौ. मनवा पडवळे, सौ. समृद्धी सनगर, श्री. प्रशांत मुकादम, श्री. प्रसाद म्हैसकर आणि सौ. आरती म्हैसकर असे अनेक साधक नोकरी करून अधिकाधिक वेळ सेवेला द्यायचे. हे सर्व जण साधनेसाठी तळमळीने प्रयत्न करतात.

कृतज्ञता आणि प्रार्थना

‘हे भगवंता, गुरुमाऊली आणि सद्गुरु सत्यवानदादा, तुमची कृपा अगाध आहे. तुम्ही साधकांना गुरुपौर्णिमेनिमित्त तुमच्या अनुभूती सांगण्याची संधी दिलीत. त्यांच्या तोंडवळ्यावरील आनंद अनुभवायला दिलात, साधकांचे निरपेक्ष प्रेम अनुभवायला दिलेत. यासाठी मी तुमच्या चरणी कृतज्ञ आहे.

हे भगवंता, गुरुमाऊली आणि सद्गुरु सत्यवानदादा मला सतत शिकण्याच्या स्थितीत रहाता येऊ दे, हीच प्रार्थना !’

– सौ. रोहिणी रमेश ताम्हनकर, रत्नागिरी (१७.८.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक