बीड – उत्तरप्रदेश येथील अवैध धर्मांतरप्रकरणाचा बीड शहराशी असलेला संबंध समोर आला आहे. धर्मांतरप्रकरणी बीड जिल्ह्यातील इरफान शेख याला उत्तरप्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. इरफान शेख हा केंद्र सरकारच्या बाल कल्याण मंत्रालयातील कर्मचारी असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशात धर्मांतर करणार्या एका मोठ्या रॅकेटचा खुलासा उत्तरप्रदेशचे अतिरिक्त महानिर्देशक (एडीजी) प्रशांत कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. त्या वेळी अनुमाने १ सहस्र हिंदूंचे धर्मांतर करण्यात आले असल्याचेही प्रशांत कुमार यांनी सांगितले होते.
यापूर्वीही धर्मांतरप्रकरणी २ मौलानांना अटक करण्यात आली होती. राष्ट्रीय स्तरावर चालू असलेल्या धर्मांतर रॅकेटचा ते भाग असल्याचे उत्तरप्रदेश पोलिसांनी म्हटले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेरोजगार, गरीब कुटुंब आणि मूकबधीर लोकांचे धर्मांतर करण्यात येत होते. या धर्मांतराच्या मुळाशी ‘आय.एस्.आय.’चे अर्थसाहाय्य असल्याचेही समोर आले आहे.