पोटदुखी (शूल) : ओवा आणि सौवर्चल गरम पाण्यासह द्यावे.
कुळथाच्या कढणात हिंग, बिडलवण आणि सुंठ यांचे चूर्ण घालून प्यावा.
पोटदुखी आणि अजीर्ण : काडेचिराइताच्या ओल्या पाल्याचा रस काढावा आणि त्यांत मिरपूड, हिंग अन् सैंधव घालून प्यावा. धने आणि सुंठ यांचा काढा द्यावा.
अजीर्ण : पिकलेल्या अननसाचे बारीक तुकडे करून त्यावर मिरे आणि सैंधव यांची बारीक पूड घालून खावे.
पोटफुगी : ओव्याचे चूर्ण आणि गूळ घ्यावा किंवा ओवा अन् गूळ यांचा काढा प्यावा. ओवा, सुंठ, पिंपळी आणि जिरे यांचे चूर्ण मधाबरोबर घ्यावे.
भूक न लागणे : ओवा तोंडात चघळावा. इसबगोल (अश्वगोल) : इसबगोलच्या बिया पाण्यात थोडा वेळ ठेवल्यास पाणी शोषण करून फुगतात. त्या अर्धा कप पाण्यात थोडा वेळ ठेवून आणि साखर घालून प्यावे.
मलावरोध, अतिसार : ६ ग्रॅम चूर्ण दह्यासह घ्यावे. रक्ती आवेमध्ये गुलाबजलातून आणि डाळिंब रसासह घ्यावे.
शौच (मळ) घट्ट; पण चिकट असल्यास : इसबगोल ६ ग्रॅम आणि एरंडेल तेल २० मिलिलिटर एक कप दुधासह घ्यावे.
मलावरोध : १० ग्रॅम इसबगोल पाण्यासह किंवा दुधासह घ्यावा.
आव : बरेच दिवस आव पडत असल्यास पिंपळी मिरीचे सूक्ष्म चूर्ण ताकात घालून द्यावे.
जुलाब : कुटजारिष्ट आणि इसबगोल दिल्याने सर्व प्रकारचे अतिसार (जुलाब) अन् प्रवाहिका नाहीशा होतात.
अतिसार आणि प्रवाहिका : ६ ग्रॅम इसबगोल द्यावा. इसबगोल मूत्राशय, श्वासमार्ग आणि जननेंद्रिय येथील दाह अन् शोथ कमी करणारा आणि रक्तस्राव थांबवणारा आहे. लिंबाचा रस पाणी आणि मधाबरोबर घ्यावा. इसबगोल कुटून खाऊ नये.
कृमी : पळसपापडी बिया दुधात उगाळून पाजावी किंवा ११ वावडिंगांचे चूर्ण लिंबाचा रस आणि मध यांसह द्यावी.
पिंपळीचे मूळ बकरीच्या मूत्रासमवेत द्यावे.
वायू आणि जंत : यांवर पुदिन्याचा रस द्यावा. आघाडा आणि शिरीष या दोघांचा स्वरस मधासमवेत घ्यावा. कडुनिंबाची पाने हिंगासह खावी. बहावाही यावर उपयुक्त आहे.
जंत : बराच अननस खावा. कारल्याच्या पाल्याचा किंवा फळांचा रस घ्यावा.