कोरोना महामारी आणि त्या अनुषंगाने दिसून आलेला प्रसारमाध्यमांचा आतंकवाद !

१. भारतीय प्रसारमाध्यमांनी कोरोना संदर्भातील भयभीत करणारी वृत्ते देऊन लोकांमध्ये आतंकवाद पसरवणे

‘गेल्या ७ दिवसांपासून कोरोनाचा वेग न्यून होत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कोरोनामध्ये घट होत आहे’, अशा प्रकारच्या बातम्या वर्तमानपत्रांमध्ये आतापर्यंत अनेकांनी वाचल्या असतील. त्याच वर्तमानपत्रांमध्ये त्यापूर्वी लोकांना घाबरवणार्‍या बातम्या येत होत्या. यालाच ‘आतंकवाद’ म्हणतात. कोरोनाविषयी अशा प्रकारचा आतंकवाद प्रसारमाध्यमांमधून मोठ्या प्रमाणात पसरवला गेला. त्यामुळे लोकांमध्ये कमालीची गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. भारत सरकारच्या संकेतस्थळावर कोरोनाची अद्ययावत स्थिती प्रत्येक मिनिटाला कळू शकते. असे असतांना प्रसारमाध्यमे चुकीच्या बातम्या का पसरवतात ?

इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा आतंकवाद हा वेगळाच असतो. काहीही झाले की, ४ ते ५ तज्ञांना बोलावून चर्चा चालू केली जाते. महामारीविषयी निर्णय घेण्यासाठी देशात ‘आय.सी.एम्.आर्.’ (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) ही संस्था आहे. यात देशातील अतिशय वरिष्ठ आधुनिक वैद्य (डॉक्टर्स) असतात. या संस्थेमध्ये देशाच्या आरोग्याशी निगडित कुठलाही निर्णय घेतला जातो.

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

माझ्या माहितीप्रमाणे ‘आय.सी.एम्.आर्.’च्या वरिष्ठ कौन्सिलमध्ये १४ आधुनिक वैद्य आहेत. ज्या वेळी ‘दोन लसी वापरायच्या कि नाही ?’, असा प्रश्‍न निर्माण झाला, तेव्हा या १४ पैकी बहुतांश आधुनिक वैद्यांनी ‘या लसी वापराव्यात’, असे मत दिले होते. त्यानंतर माध्यमांनी परत आतंकवाद पसरवला की, त्यातील एका आधुनिक वैद्याने ‘म्हणे, ती लस सुरक्षित नाही’, असे म्हटले आहे, असे वृत्त दिले. प्रत्येक वेळी एकीकडे १४ आणि शून्य असे कधीही होत नाही. एखाद्याचा अनुभव आणि दृष्टीकोन निराळा असू शकतो. जेव्हा ‘संबंधित लस किंवा औषध सुरक्षित आहे आणि आपण विशिष्ट प्रोटोकॉलचे (नियमावलीचे) पालन केले पाहिजे’, असे बहुतांश आधुनिक वैद्य सांगतात, तेव्हा आपण त्यांचे ऐकले पाहिजे. त्याला १-२ आधुनिक वैद्यांचा अपवाद असू शकतो.

२. माध्यमांनी लसीकरणाविषयी अपप्रचार करून लोकांच्या मनात गोंधळ निर्माण करणे

माध्यमांकडून लसीविषयी अपप्रचार करण्यात आला. तेव्हा देशात लस उपलब्ध होती. माध्यमांच्या आतंकवादामुळे सरकारला लस घेण्याविषयी आवाहन करावे लागले. वर्तमानपत्रांमध्ये विज्ञापने द्यावी लागली. त्यात वलयांकित व्यक्तींचे ‘बघा, मीही लस घेतली आहे आणि मला काही झाले नाही’, अशी विधाने असणारी वृत्ते छापावी लागली. यात २५ दिवस गेले. एखाद्या व्यक्तीला लस घेतल्यावर कोरोना झाला असेल, तर त्याविषयीही अपप्रचार करण्यात आला. ही लस घेतल्यावर १०० टक्के लोकांना त्याचा लाभ होईल, असे शक्य नाही. कोणतीही लस १०० टक्के सुरक्षित नसते. काही कारणांमुळे १० टक्के लोकांना तिचा कदाचित् लाभ होणार नाही; पण ९० टक्के लोक तर सुरक्षित राहू शकतात. जगभरातील लोकांनी ही लस स्वीकारल्यावर भारतातील लोकांचा विश्‍वास बसला. त्यानंतर लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी व्हायला लागली.

दळणवळण बंदीच्या संदर्भातही माध्यमांकडून असाच आतंकवाद पसरवण्यात आला. ‘कडक दळणवळण बंदी लागणार’, ‘मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय होणार’, अशा बातम्या सातत्याने देण्यात आल्या. ‘कडक दळणवळण बंदी’ हा चांगला पर्याय असला, तरी प्रत्यक्षात तो अधिक वेळ कार्यवाहीत आणणे शक्य नाही. त्यामुळे रोजंदारीवर काम करणार्‍या लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्‍न निर्माण होतो. देशात एकाही राज्य सरकारने १०० टक्के दळणवळण बंदी लावली नाही. मग दळणवळण बंदीविषयी लोकांना का घाबरवले जाते ? त्यामुळे अशा प्रकारचा आतंकवाद थांबला पाहिजे.

३. प्रसारमाध्यमांनी लोकांच्या भावना समजून घेऊन वृत्ते प्रसारित करावीत !

एखादी सामाजिक संस्था किंवा व्यक्ती चांगले काम करत असेल, तर ते वृत्त माध्यमांमध्ये पसरायला वेळ लागतो; पण वाईट बातमी वेगाने पसरते. आपत्कालीन परिस्थितीत अफवांमुळे देशाची पुष्कळ हानी होत असते. माध्यमांनी स्मशानभूमीमध्ये होत असलेल्या मृतदेहांच्या गर्दीची वृत्ते दाखवली. माध्यमांमधील काही गिधाडांनी अंत्यसंस्कारांची छायाचित्रे आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये पाठवली. त्यात तथ्य असेलही; पण आज महामारीमुळे मृतांची संख्या अधिक आहे; म्हणून अचानक स्मशानभूमींची संख्या वाढवता येत नाही. शहरीकरण वाढले; म्हणून स्मशानभूमींची संख्या वाढत नाही; कारण शहरांमध्ये स्मशानभूमींना जागाच मिळत नाही. सरकारची भूमी असली, तरी त्या परिसरातील लोकांचा स्मशानभूमीला विरोध असतो. कुणालाही स्वतःच्या घराजवळ स्मशानभूमी नको असते.

अशा परिस्थितीत स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करणार्‍यांची संख्या वाढली, तर नवल नाही. माध्यमांमधील गिधाडांनी याविषयी अत्यंत वाईट बातम्या दिल्या. एवढेच नाही, तर त्यांनी या गोष्टी आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये प्रसारित केल्या. त्यामुळे जगात भारताची मानहानी झाली. अनेक कुटुंबांच्या ‘प्रायव्हसी’कडे (खासगी गोष्टींकडे) दुर्लक्ष करण्यात आल्याने त्यामुळे त्यांना वाईट वाटले. ही छायाचित्रे आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये १०० ते ३०० डॉलर्समध्ये उपलब्ध होती. माध्यमांनी लोकांच्या भावना समजून घेऊन वृत्ते दिली पाहिजेत.

४. वृत्तवाहिन्यांनी २४ घंटे बातम्या देण्यापेक्षा दिवसभरात केवळ दोनदाच बातम्या द्याव्यात !

देशाचे वैज्ञानिक सल्लागार म्हणतात की, कोरोनाची तिसरी लाट अपेक्षित आहे. त्यांनी सांगितले आहे, तर ते आपल्याला मानावेच लागेल आणि त्याविषयीची काळजी आतापासूनच घ्यावी लागेल. माझे ठाम मत आहे की, माध्यमांमधील आतंकवाद थांबवण्यासाठी वृत्तवाहिन्यांनी २४ घंटे बातम्या देण्यापेक्षा दिवसातून केवळ दोन वेळा ठरवून बातम्या द्याव्यात. वर्तमानपत्रही १० ते १२ पानांऐवजी २ ते ३ पानांचे करावे. तसेच सामाजिक माध्यमांवर चुकीची माहिती पसरवणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करावी.’

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे