औषधी वनस्पतींची लागवड आवश्यक !

पुणे विद्यापिठामधील साहाय्यक प्राध्यापक डॉ. दिगंबर मोकाट यांचे मार्गदर्शन घेऊन श्री. सुनील पवार या केवळ बारावी शिकलेल्या तरुणाने मागील २ वर्षांपासून औषधी वनस्पतींची लागवड करून लाखो रुपयांची उलाढाल केली आहे, तसेच अनेकांना यामधून रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. शहापूर तालुक्यातील (जिल्हा ठाणे) खरीड गावामधील या तरुणाने वर्ष २०१८ मध्ये ‘आदिवासी एकात्मिक संस्था’ चालू करून हवनासाठी लागणार्‍या समिधा आणि जंगलातील औषधी वनस्पती यांची विक्री चालू केली. त्याला चांगला प्रतिसाद लाभला. श्री. सुनील पवार यांनी केलेली ही कृती कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे. करीअर, विज्ञान आणि संगणकीय तंत्रज्ञान यांच्या मागे लागलेल्या तरुणांसमोर श्री. सुनील यांनी आदर्श ठेवलेला आहे.

​ऋषिमुनींनी आयुर्वेदामध्ये औषधी वनस्पतींचे लाभ लिहून ठेवलेले आहेत; परंतु भारतातच या शास्त्राच्या झालेल्या उपेक्षेमुळे आज त्यातील औषधी वनस्पती दुर्मिळ होत चाललेल्या आहेत. आगामी भीषण आपत्काळामध्ये आरोग्यरक्षणासाठी आपल्याला ॲलोपॅथीतील औषधांचा नव्हे, तर आयुर्वेदाचा आधार असणार आहे. ‘तहान लागल्यावर विहीर खोदायची नसते !’, या म्हणीप्रमाणे आपल्याला औषधी वनस्पती सहज उपलब्ध होण्यासाठी आतापासूनच त्यांची लागवड करावी लागेल.

​जगभरात ओैषधी वनस्पतींना असलेली वाढती मागणी, त्यांची होणारी तस्करी, तसेच आधुनिकीकरणाच्या नावाखाली होणारी अनिर्बंध वृक्षतोड यांमुळे अनेक ओैषधी वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी त्यांची लागवड करणे आणि त्यांचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे. एकंदरच औषधी वनस्पतींची लागवड आणि तिचा पुरवठा या क्षेत्राकडे तरुणांनी वळणे, ही काळाची आवश्यकता आहे. शासनानेही यामध्ये लक्ष घालून मोठ्या प्रमाणात लागवड करणार्‍यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये पुढाकार घेणे आवश्यक आहे. भावी हिंदु राष्ट्रात आयुर्वेद हीच मुख्य उपचारपद्धती असेल. आयुर्वेदाला मुख्य उपचारपद्धत बनवण्यासाठी प्रत्येकानेच प्रयत्न करणे आवश्यक आहे. औषधी वनस्पतींची लागवड हा त्याचाच एक भाग आहे.

– श्री. जयेश बोरसे, पुणे