भीषण आपत्काळामध्ये आरोग्यरक्षणासाठी आतापासून औषधी वनस्पतींची लागवड करा !

आपत्काळातील संजीवनी औषधी वनस्पती !

आतापर्यंतच्या लेखामध्ये औषधी वनस्पतींच्या लागवडीची आवश्यकता, त्यांच्या लागवडीमुळे होणारे लाभ, तसेच अत्यल्प श्रमात आणि चालू शेतीत आंतरपीक म्हणून लावता येण्याजोग्या औषधी वनस्पती यांविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

मागील भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/485473.html

१२. औषधी वनस्पतींची लागवड साधना म्हणून करा !

१२ अ. औषधी वनस्पतींची लागवड साधना म्हणून करण्याचे महत्त्व : माणूस ज्या वातावरणात वाढतो त्यानुसार त्याचा स्वभाव बनतो. माणसातील गुणदोषांसाठी जसे आजूबाजूचे वातावरणही एक कारण असते, तसेच वनस्पतींच्या संदर्भातही आहे. औषधी वनस्पतींच्या भोवतालचे वातावरण जेवढे सात्त्विक असेल, तेवढ्या त्या अधिक सात्त्विक बनतात. जेवढा सत्त्वगुण जास्त, तेवढेच वनस्पतींमधील औषधी गुणही वाढतात. साधनेमुळे सत्त्वगुण वाढतो. औषधी वनस्पतींची लागवड निवळ अर्थाजनाचे साधन म्हणून नव्हे, तर ईश्वरप्राप्तीसाठीची साधना म्हणून केल्यास वनौषधी सात्त्विक होण्यास साहाय्य होते.

१२ आ. लागवड करतांना करावयाच्या प्रार्थना आणि ठेवायचा भाव

१२ आ १. प्रार्थना

अ. वनस्पती लावण्यापूर्वी धरणीमातेला ‘हे धरणीमाते, तू जसा मला आधार दिला आहेस, तसा या वनस्पतीलाही आधार दे. तू हिचे पोषण कर आणि हिच्यामध्ये योग्य ते औषधी गुणधर्म निर्माण कर !’, अशी प्रार्थना करावी.

आ. औषधी वनस्पती लावतांना त्या वनस्पतीलाही प्रार्थना करावी की, हे औषधी वनस्पती, तुझ्यात आणि माझ्यात मित्रत्वाचे नाते निर्माण होऊ दे. तुझ्यापासून रुग्णाइत माणसांना त्यांचे रोग दूर होण्यास साहाय्य होऊ दे.’

इ. लागवड करते वेळी लागवडीसाठी वापरण्यात येणारी कुदळ, टोपली आदी उपकरणांनाही प्रार्थना करावी.

१२ आ २. भाव : ‘औषधी वनस्पतींच्या लागवडीतून मला देव भेटणार आहे’, असा भाव ठेवावा. वनौषधींविषयी कृतज्ञतेचा भाव ठेवावा.

१२ इ. लागवडीमधील सात्त्विकता टिकून रहाण्यासाठी काय करावे ?

१. लागवडीमध्ये वावरतांना प्रार्थना आणि नामजप चालू ठेवावा, तसेच मन शांत आणि प्रसन्न ठेवावे. धसमुसळेपणा करू नये.

२. मासिक पाळी चालू असतांना स्त्रियांनी औषधी वनस्पतींना स्पर्श करू नये.

१३. वातावरणातील सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांचा वनस्पतींवर होणारा परिणाम

१३ अ. वनस्पतींना मन असणे आणि त्यांच्यात प्रतिसाद देण्याची क्षमताही असणे : ‘वनस्पतींनाही मन असते. त्यांना भावना असतात’, असे प्राचीन ऋषीमुनींनी सहस्रावधी वर्षांपूर्वी लिहून ठेवले आहे. भारताचे सुपुत्र डॉ. जगदीश चंद्र बोस यांनी हे आधुनिक प्रयोगांद्वारे सिद्धही केले आहे. वनस्पतींवर आपण जेवढे प्रेम करू, तेवढे त्या आपल्यावर प्रेम करतात. त्यांच्यासाठी आपण जेवढा जीव लावू, तेवढे त्या आपल्याला जपतात.

१३ अ १. वनस्पतींनी मानवाला मार्गदर्शन करण्याचे उदाहरण : व्यक्तीमध्ये ईश्वराप्रती भाव असेल आणि वनस्पतींचे बोलणे जाणण्याची क्षमता असेल, तर वनस्पती त्या व्यक्तीला मार्गदर्शनही करतात. सांगली येथील सुप्रसिद्ध वैद्य आणि आयुर्वेदातील पांचभौतिक चिकित्सेचे अध्वर्यु कै. आत्माराम वामनशास्त्री दातार यांना वृक्षदेवता स्वतःमधील औषधी गुणधर्मांविषयी मार्गदर्शन करत असत.

१३ आ. वनस्पतींवर वातावरणातील सात्त्विकतेचा आणि असात्त्विकतेचा परिणाम होणे : ‘प्रख्यात भारतीय संशोधक डॉ. जगदीशचंद्र बोस यांनी अती सूक्ष्म लहरींमुळे वनस्पतींच्या ऊतींवर (‘टिश्यूं’वर) होणारा परिणाम आणि पेशींच्या आतील आवरणाच्या (‘सेल मेम्ब्रेन’च्या) क्षमतेत होणारे तत्सम पालट यांचा अभ्यास केला. असा अभ्यास करणारे ते जगातील पहिले संशोधक होते. डॉ. बोस यांनी ‘वनस्पतींनाही भावना असतात, त्यांना वेदना होऊ शकतात, त्यांना प्रेम समजू शकते,’ अशा विविध गोष्टी संशोधन करून सांगितल्या. वनस्पती बाह्य वातावरणाच्या संदर्भात पुष्कळ संवेदनशील असतात, तसेच त्यांच्यात सूक्ष्मातील स्पंदने जाणण्याची आणि ग्रहण करण्याची विशेष क्षमता असते. वनस्पतींवर वातावरणातील सात्त्विकतेचा आणि असात्त्विकतेचा परिणाम होत असतो.

१४. वनस्पतींना होणार्‍या वाईटशक्तींच्या त्रासांवर आध्यात्मिक उपाय

१४ अ. वाईट शक्ती म्हणजे काय ? : वाईट शक्ती म्हणजे त्रासदायक सूक्ष्म-देह (लिंगदेह).

१४ आ. वनस्पतीला वाईट शक्तींचे त्रास होण्यामागील काही कारणे

१४ आ १. वनस्पतीला दृष्ट लागणे : व्यक्तीला जशी दृष्ट लागते, तशी वनस्पतीलाही दृष्ट लागू शकते.

१४ आ २. धन्याच्या (मालकाच्या) अतृप्त पूर्वजांनी त्रास देणे

१४ आ ३. घरात किंवा आवारात वाईट शक्तींचा त्रास असणे

१४ आ ४. वनस्पतीच्या धन्यावर किंवा त्याच्या कुटुंबावर येऊ शकणारे संकट वनस्पतीवर जाणे : वनस्पतीच्या धन्यावर किंवा त्याच्या कुटुंबावर येऊ शकणारे अपघात, अपमृत्यू यांसारखे एखादे संकट त्या घराच्या परिसरातील एखाद्या सात्त्विक वनस्पतीवर जाऊन ती वनस्पती वाळू लागते. काही वेळा असे संकट ती वनस्पती आपणहून स्वतःवर घेते.

१४ आ ५. वनस्पतीच्या धन्यावर कुणीतरी करणी आदी करणे : वनस्पतीच्या धन्याचे अहित करण्यासाठी कुणी त्याच्यावर करणी, मूठ मारणे आदी कृत्ये केली असल्यास काही वेळा ती कृत्ये धन्याऐवजी वनस्पतीवर जाऊन ती वनस्पती वाळू लागते.

१४ इ. वनस्पतीला होणार्‍या वाईट शक्तींच्या त्रासाची (आध्यात्मिक त्रासाची) काही लक्षणे : वनस्पती अचानक वाळू लागणे, तिच्यावर रोग पडणे, तिच्या पाना-फळांवर डाग पडणे, कीड लागणे, फुले-फळे येण्याचे बंद होणे, खोडावर त्रासदायक आकृत्या उमटणे आदी त्रास वाईट शक्तींमुळेही होऊ शकतात. असे त्रास वाईट शक्तींमुळे झाले असल्यास वनस्पतीभोवती त्रासदायक स्पंदने जाणवतात, तसेच वनस्पतीच्या जवळ गेल्यावर डोके जड होणे, मळमळणे, काही न सुचणे आदी शारीरिक अन् मानसिक त्रास होऊ शकतात.

१४ ई. ‘आध्यात्मिक स्तरावरील उपाय’ म्हणजे काय ? : वनस्पतींना वाईट शक्तींचे त्रास (आध्यात्मिक त्रास) होऊ नयेत किंवा असे त्रास होत असल्यास ते दूर व्हावेत, यांसाठी करण्यात येणार्‍या उपायांना ‘आध्यात्मिक स्तरावरील उपाय’ असे म्हणतात.

१४ उ. आध्यात्मिक स्तरावरील उपाय कधी करावेत ?

१. वर दिलेली कारणे किंवा लक्षणे यांवरून वनस्पतींना वाईट शक्तींचे त्रास होत असल्याचे स्वतःच्या लक्षात आल्यास त्रास दूर करण्यासाठी पुढे दिल्यानुसार आवश्यक ते आध्यात्मिक स्तरावरील उपाय करावेत. स्वतःच्या लक्षात येत नसल्यास ज्योतिषी, चांगली साधना असणारी व्यक्ती, अध्यात्मातील अधिकारी व्यक्ती किंवा संत यांना विचारावे.

२. वनस्पतीला रोग होण्यामागे माती, पाणी आणि हवामान पूरक नसणे; दोन वनस्पतींमधील अंतर आवश्यकतेपेक्षा अल्प असणे; आवश्यक तेवढे ऊन आणि पोषक द्रव्ये न मिळणे, कीड लागणे आदी भौतिक कारणेही असू शकतात. या भौतिक कारणांवर या क्षेत्रातील तज्ञांना विचारून उपाययोजना करावी. ही उपाययोजना करूनही अपेक्षित परिणाम दिसत नसल्यास आध्यात्मिक स्तरावरील उपायही करून पहावेत.

३. आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यामुळे वनस्पतींचे, तसेच लागवड केलेल्या क्षेत्राचे वाईट शक्तींपासून रक्षण होण्यास साहाय्य होते. तसेच स्वतःच्या क्षमतेनुसार नियमितपणे आध्यात्मिक स्तरावरील उपाय करावेत.

१४ ऊ. काही आध्यात्मिक स्तरावरील उपाय

१४ ऊ १. अग्निहोत्र करणे : लागवडीखालील क्षेत्रात प्रतिदिन अग्निहोत्र करावे. (‘अग्निहोत्र कसे करावे’, याचे विवेचन सनातनचा ग्रंथ ‘अग्निहोत्र’ यात केले आहे.)

१४ ऊ २. विभूतीचा वापर करणे : यासाठी सात्त्विक उदबत्तीची विभूती वापरावी. ती अधिक काळ सात्त्विक रहाण्यासाठी तिच्यात यज्ञ, संतांनी दिलेली विभूती किंवा अग्निहोत्र यांतील विभूती मिसळावी.

१४ ऊ २ अ. विभूतीचा वापर करण्यापूर्वी उपास्यदेवतेला प्रार्थना करावी ! : प्रार्थना अशी करावी – ‘हे देवते (देवतेचे नाव घ्यावे), विभूतीतील चैतन्याने वनस्पतींचे आध्यात्मिक त्रासांपासून रक्षण होऊ दे.’

१४ ऊ २ आ. विभूतीचा वापर असा करावा ! : वनस्पतींना रोगाची लागण होऊ नये, यासाठी किंवा रोगाची लागण झाली असल्यास रोगाचे निवारण व्हावे, यासाठी पुढीलपैकी एक उपाय नियमितपणे करावा.

१४ ऊ २ आ १. वनस्पतींना विभूती-मिश्रित पाणी घालावे !

१४ ऊ २ आ २. वनस्पतींवर विभूती फुंकावी ! : एखादे झाड किंवा घराच्या सज्जातील (‘बाल्कनी’तील) २ – ४ कुंड्यांतील वनस्पती यांवर विभूती सहजपणे फुंकताही येते. विभूती फुंकण्यासाठी एखादा जुना सात्त्विक ग्रंथ वा लघुग्रंथ यावर थोडीशी विभूती घ्यावी. हे शक्य नसेल, तर विभूती कागदावर वा उजव्या तळहातावर घ्यावी. विभूती फुंकतांना ती वनस्पतीच्या दिशेने हळुवार फुंकावी.

१४ ऊ ३. लागवड केलेल्या क्षेत्रात संतांच्या वाणीतील (आवाजातील) भजने लावून ठेवणे : वनस्पतींची लागवड केलेल्या ठिकाणी संतांच्या वाणीतील भजने (उदा. संत भक्तराज महाराज यांनी गायलेली भजने) लावून ठेवावीत. संतांच्या वाणीमध्ये चैतन्य असते. त्यामुळे आध्यात्मिक स्तरावरील उपाय होतात.

१४ ऊ ४.  ग्रामदेवतेला प्रार्थना करणे आणि तिच्याशी संबंधित परंपरागत धार्मिक कृत्ये करणे

(समाप्त)

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘औषधी वनस्पतींची लागवड कशी करावी ?’)

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com

संपर्क : (०८३२) २३१२६६४

आपत्काळाच्या दृष्टीने वनौषधींच्या लागवडीचे महत्त्व दर्शवणारी ही लेखमाला साधक आणि वाचक यांनी संग्रही ठेवावी.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.