संतांच्या वंदनीय उपस्थितीत युवा साधकांचे ‘ऑनलाईन प्राथमिक शिबिर’ पार पडले !
फोंडा (गोवा) – साधनेमुळे आपल्याला भगवंताचे कृपाछत्र मिळते आणि येणार्या आपत्काळात आपण केवळ साधनेच्याच बळावर तरून जाऊ शकतो, असे मार्गदर्शन सनातनचे संत पू. अशोक पात्रीकर यांनी नुकत्याच झालेल्या दोन दिवसांच्या ‘ऑनलाईन’ युवा साधना शिबिरात केले. या शिबिराचा प्रारंभ गणेश वंदना, भगवान श्रीकृष्णाच्या श्लोकाचे स्तवन आणि शंखनाद करून झाला. पू. पात्रीकर यांनी या वेळी व्यष्टी साधना, कुलदेवतेचा आणि दत्ताचा नामजप यांचे महत्त्व, साधनेची मूलभूत तत्त्वे यांविषयी मौल्यवान असे मार्गदर्शन केले.
शिबिराच्या प्रारंभी अश्विनी कुलकर्णी यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. या शिबिरात काही युवा साधकांनी ‘आपत्काळात व्यष्टी साधनेमुळे झालेला लाभ’ याविषयी त्यांचे अनुभवकथन केले. या वेळी पूर्ण वेळ साधना करणार्या काही युवा साधकांनी स्वतःचे अनुभवकथन केले. या शिबिराचा लाभ भारतभरातील एकूण ४८६ युवक-युवतींनी घेतला.
युवा शिबिरात घेण्यात आलेले विविध विषय
१. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट आणि समितीच्या कु. प्रियांका लोणे यांनी शिबिरातील सहभागी युवकांना ‘आदर्श संपर्क कसा करावा ?’, याविषयी मार्गदर्शन केले. तसेच संपर्क करण्याचा प्रायोगिक भागही करून घेतला.
२. ‘सामाजिक माध्यमांचा (‘सोशल मीडिया’चा) वापर प्रभावीपणे कसा करावा आणि त्यायोगे अध्यात्मप्रसार कसा करावा’, याविषयी श्री. प्रदीप वाडकर आणि कु. स्नेहल गुब्याड यांनी विवेचन केले. ‘फेसबूक’, ‘ट्विटर’ आदी सामाजिक माध्यमांचा राष्ट्र आणि धर्म या घटकांवर कसा सकारात्मक परिणाम होतो, हे उदाहरणांसह स्पष्ट केले.
३. श्री. कार्तिक साळुंके आणि सौ. वेदिका पालन यांनी ‘सेवेची फलनिष्पत्ती वाढण्यासाठी वेळेचे सुयोग्य नियोजन कसे करावे’, याविषयी मार्गदर्शन केले.
४. शिबिराच्या अंतिम सत्रात सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी साधनाविषयक मार्गदर्शन केले.
आध्यात्मिक स्तरावरील उपाय नियमित केल्यास देवाच्या चैतन्याचा लाभ होतो ! – सद्गुरु सत्यवान कदम, धर्मप्रचारक, सनातन संस्था
सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांनी उपस्थित युवा साधकांना ‘आध्यात्मिक स्तरावरील उपायांचे महत्त्व’ याविषयी मार्गदर्शन केले. या वेळी ते म्हणाले, ‘‘आपण आध्यात्मिक स्तरावरील उपाय नियमित केल्यास आपल्याला देवाच्या चैतन्याचा लाभ होऊन आपली आध्यात्मिक प्रगती जलद गतीने होऊ शकते. वास्तुदोषामुळे आपल्याला अनेक अशा अनिष्ट शक्तींचा त्रास होऊ शकतो. यासाठी वास्तुची शुद्धी करणे आवश्यक आहे.’’
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |