ज्येष्ठ शुक्ल पक्ष नवमी (१९.६.२०२१) या दिवशी डिचोली, गोवा येथील श्रीमती सुनंदा सामंत ८४ वर्षे पूर्ण करून ८५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्त त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून त्यांची मुलगी आणि जावई यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
श्रीमती सुनंदा सामंत यांना सनातन परिवाराच्या वतीने वाढदिवसानिमित्त कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत (मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१ अ. हसतमुख
‘आईने बालपणापासून फार कष्ट केले आहेत. आईच्या जीवनात पुष्कळ चढ-उतार येऊनही आई सतत हसतमुख असते. मी तिला कधीही दुर्मुखलेले पाहिले नाही.
१ आ. नमते घेणे
आईच्या विवाहाच्या वेळी तिचे बी.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण होऊन ती विद्यालयात शिकवत होती. तिला तिचे शिक्षण किंवा नोकरी यांचा अहं नव्हता. ती सर्वांशी नम्रतेने वागायची. माझी आजी (आईची सासू) आणि माझे बाबा (आईचे यजमान) कडक स्वभावाचे होते; परंतु आईच्या नमते घेण्याच्या स्वभावामुळे ती संसार करू शकली.
१ इ. कष्टाळू स्वभाव
आईची शाळा ४५ कि.मी. दूर असलेल्या गावात होती. त्या वेळी बसेस अधिक संख्येने नव्हत्या. आई पहाटे उठून काही दिवस चुलीवर आणि नंतर ‘केरोसिनच्या स्टोव्ह’वर सर्वांसाठी अल्पाहार अन् स्वयंपाक करून धावतपळत बस पकडायची आणि गावातील शाळेत सकाळी ८ वाजायच्या आधी पोचायची. ती १ वाजता शाळा सुटल्यावर घरी येऊन घरातील उर्वरित सर्व कामे करायची. आम्ही गावी गेल्यावर ती तेथील एकत्र कुटुंबातील सर्व कामेही सहजतेने करायची. यातही ‘आपण काही विशेष करत आहोत’, असे ती कधीही जाणवू द्यायची नाही.
१ ई. त्यागी वृत्ती
१. आई पहिल्यापासून तिच्याकडे जे आहे, ते सतत मुक्तहस्ते इतरांना देतेे. त्यात ती आपले-परके असा भेदभाव करत नाही. माझ्या लहानपणी ती माझ्यासाठी कपडे घेतांना गावी असणार्या माझ्या चुलत बहिणीसाठीही तसेच कपडे घेत असे. तिच्याकडे कुणीही काही मागितल्यास ती त्याला कधीही विन्मुख पाठवत नाही. तिच्या या स्वभावाचा काहींनी अपलाभही घेतला आहे, तरीही आई आजही सर्वांना साहाय्य करते. ‘यात काही विशेष करत आहे’, असे तिच्या मनात नसते.
२. बाबांना काही काळ त्यांच्या गावच्या घरीही साहाय्य करायला लागायचे. त्या वेळी आई खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहिली. तिने अनेक वर्षे दोन कुटुंबांचा संसार आनंदाने सांभाळला. आईने नोकरी केली; परंतु स्वतःसाठी विशेष व्यय केला नाही. तिला इतरांना देण्यातच आनंद वाटतो.
१ उ. मुलगी आणि जावई यांचा पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय सहजतेने स्वीकारणे
आम्ही (मी आणि यजमान आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत) वर्ष १९९८ मध्ये पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी आईने त्याविषयी विचारपूस किंवा विरोध केला नाही. तिने आमचा निर्णय सहजतेने स्वीकारला.
१ ऊ. चि. मुकुलच्या संगोपनाचे दायित्व सहजतेने स्वीकारून उत्तम रितीने पार पाडणे
वर्ष १९९८ मध्ये मी पूर्णवेळ साधना करण्याचे ठरवल्यावर ‘माझ्या दीड वर्षाच्या मुलाला (चि. मुकुलला) कुठे ठेवायचे ?’, असा प्रश्न होता. त्या वेळी मुकुलला आईकडे ठेवण्याचा निर्णय आम्हाला परस्पर घेता आला. तो तिने काहीही आढेवेढे न घेता आनंदाने स्वीकारला. पुढे काही वर्षे आमच्याकडून कोणतेही साहाय्य न मिळूनही तिने मुकुलचा सांभाळ केला. आईने मुकुलचा अत्यंत प्रेमाने सांभाळ केल्यामुळेच आम्ही निश्चिंत होऊन साधनेला पूर्ण वेळ देऊ शकलो.
२. आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत (जावई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
२ अ. मर्यादा राखून बोलणे आणि शिकवण्याची वृत्ती नसणे
सौ. नंदिनीशी माझा विवाह वर्ष १९९० मध्ये झाला. तेव्हापासून मला ती. आईंचे मर्यादा राखून बोलणे, आवश्यक तितके बोलणे, हे गुण जाणवले. त्या पेशाने शिक्षिका होत्या; परंतु ‘त्या सहसा कुणाला काही शिकवत आहेत किंवा फुकाचा उपदेश करत आहेत’, असे मला आढळले नाही. मी खोलीत असतांना पूर्वी त्या तिथे बसायच्याही नाहीत.
२ आ. मनमिळाऊ स्वभावामुळे इतरांना सहज आपलेसे करून घेणे
त्यांचा स्वभाव मनमिळाऊ आहे. त्या आमच्याकडे सांगली येथे रहायला असतांना त्यांची आमच्या शेजार्यांशी (शिंंदे परिवाराशी) इतकी जवळीक झाली की, त्या आणि त्यांची सून सौ. अदिती आजही (आम्ही सांगली सोडून २३ वर्षे उलटल्यानंतर) त्यांच्याकडे जाऊन घरच्याप्रमाणे राहू शकतात. आमच्या शेजार्यांशी आमचीही एवढी जवळीक नसेल, इतकी ती. आईंची आहे. आमचे सांगलीचे शेजारीही डिचोलीला हक्काने येऊन राहून जातात.
२ इ. अनेक कठीण प्रसंगांत स्थिर असणे
२ इ १. पतीच्या निधनानंतर अल्पावधीत सावरणे : वर्ष १९९६ मध्ये सौ. नंदिनीच्या वडिलांचे त्यांच्या वयाच्या ५६ व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले. यजमानांच्या निधनानंतर त्यांनी स्वतःला चांगल्यापैकी सावरले. त्यानंतर त्या अल्पावधीत निवृत्त झाल्या.
२ इ २. मुलाच्या पायाचा अस्थिभंग झाल्यावरही स्थिर असणे : वर्ष १९९८ मध्ये श्री. अनिल यांचा (त्यांच्या मुलाचा) अपघात होऊन त्यांच्या पायाच्या हाडाचा गंभीर अशा प्रकारचा अस्थिभंग झाला. त्यावर उपचारासाठी त्या कोकणातून सांगलीला त्याच्या समवेत आमच्या घरी येऊन राहिल्या. श्री. अनिल यांच्या पायावर ३ शस्त्रकर्मे झाली. त्या वेळीही त्या स्थिर होत्या.
२ इ ३. वैयक्तिक जीवनातील अडचणींत स्थिर रहाणे : त्यांना त्यांच्या वैयक्तिक जीवनात ज्या अडचणींना सामोरे जावे लागले, त्या त्यांनी सहजतेने स्वीकारल्या. त्याविषयी त्यांनी तक्रारीच्या सुरात मुलाला किंवा संबंधितांना सुनावले नाही. अन्य कुणाच्या वाट्याला अशा अडचणी आल्या असत्या, तर त्या व्यक्तीने माहेरी किंवा अन्य जीवलगांना पुनःपुन्हा सांगून त्याविषयी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला असता; परंतु त्यांनी तसे कधीच केले नाही. त्यांना आर्थिक हानीही सोसावी लागली, तरी त्याविषयीही त्यांनी कधी कुणाला सांगितले नाही.
२ इ ४. जावयाने पूर्णवेळ साधना करण्याचा परस्पर निर्णय घेऊनही त्याविषयी काहीही प्रतिक्रिया नसणे : वर्ष १९९८ मध्ये मी एका सेवेसाठी मुंबई येथील सेवाकेंद्रात गेलो आणि तिथेच राहिलो. त्या वेळी त्या सांगली येथे आल्या होत्या. तेव्हा ‘तुम्ही व्यवसाय सोडून नेमके काय करता ?’, असे त्यांनी एका शब्दानेही मला विचारले नाही.
२ इ ५. मुलीला व्यष्टी साधनेसाठी घरी पाठवले असतांना स्थिर रहाणे : सौ. नंदिनीला एक दशकापूर्वी व्यष्टी साधनेसाठी सांगण्यात आले होते. तेव्हा ती माहेरी डिचोलीला गेली. तेव्हा मी आणि मुकुल आश्रमात रहात होतो. या वेळी ती. आईंच्या जागी अन्य कुणी असते, तर मला त्यांनी अनेक प्रश्न विचारले असते; मात्र त्यांच्याकडून तसे काही प्रश्न आले नाहीत.
२ ई. ‘अडचणीच्या वेळी मुलगी आणि जावई यांनी साहाय्य करावे’, अशी अपेक्षा नसणे : आम्ही सेवांच्या व्यस्ततेमुळे डिचोलीला जाऊ शकत नव्हतो. त्या वेळीही त्यांनी त्याविषयी कधी नकारात्मक विचार केले नाहीत. त्यांनी ‘घरात अडचण आहे, तर ‘तुम्ही या. साहाय्य करा’, असेही आम्हाला कधी सांगितले नाही. रामनाथी आश्रमात दैनिक ‘सनातन प्रभात’चा वर्धापनदिन असल्यास किंवा घरी नातेवाईक आल्यास त्या त्यांना घेऊन खासगी गाडी करून आम्हाला आश्रमात भेटायला यायच्या. (१.६.२०२१)