सायबर गुन्हे रोखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून १५५२६० हा ‘हेल्पलाईन’ क्रमांक प्रसारित !

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – केंद्रीय गृहमंत्रालयाने सायबर गुन्ह्याच्या विरोधातील तक्रारींचे निवारण तात्काळ करण्यासाठी आणि डिजिटल व्यवहार सुरक्षित बनवण्यासाठी साहाय्यता (हेल्पलाईन) क्रमांक १५५२६० प्रसारित केला आहे. या हेल्पलाईनमुळे फसवणुकीची तक्रार तात्काळ प्रविष्ट करता येणे शक्य होणार आहे. फसवणूक झालेल्या व्यक्तीने या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधल्यावर पोलीस अधिकार्‍यांना तातडीने संदेश पाठवला जाईल. फसवणुकीच्या घटनेला २४ घंट्याहून अधिक कालावधी झाला असेल, तर त्याची तक्रार ‘नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिग पोर्टल’वर करता येईल. सध्या ७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांत ही सुविधा लागू असेल. यात उत्तराखंड, उत्तरप्रदेश, देहली, राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि तेलंगाणा यांचा समावेश आहे.

हा क्रमांक १ एप्रिल २०२१ पासून प्रायोगित तत्त्वावर चालू करण्यात आला होता. माहितीनुसार, गेल्या २ मासांत या क्रमांकावर १ कोटी ८५ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या फसवणुकीच्या तक्रारी नोंद झाल्या आहेत. देहली आणि राजस्थान या राज्यांतील अनेक खाती बंद करण्यात आली आहेत.