भीषण आपत्काळातून तरून जाण्यासाठी ईश्वराचा भक्त होणे आवश्यक ! – सौ. राजश्री तिवारी, हिंदु जनजागृती समिती

सांगली आणि कोल्हापूर येथील धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा

सौ. राजश्री तिवारी

कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराज हे नेहमी श्री भवानीदेवीचे नामस्मरण करत असत. त्यामुळेच तेअफझलखानाचा वध करू शकले. महाभारतात पांडवांसमवेत श्रीकृष्ण असल्याने ते कौरव सेनेवर विजय मिळवू शकले. अशी अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. आपल्यालाही व्यष्टी आणि समष्टी कार्य करतांना त्यात ईश्वराचे अधिष्ठान असायला हवे. आदर्श हिंदु राष्ट्र संघटक बनण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधनेचा समतोल साधणे आवश्यक आहे. जो ईश्वराचा भक्त आहे, त्याचे ईश्वर कोणत्याही परिस्थितीत रक्षण करतोच. त्यामुळे येणार्‍या भीषण आपत्काळातून तरून जाण्यासाठी ईश्वराचा भक्त बनणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगली आणि कोल्हापूर येथील धर्मप्रेमींसाठी नुकतेच ‘ऑनलाईन हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. या कार्यशाळेचा उद्देश कु. सविता खेराडकर यांनी विशद केला, तर सूत्रसंचालन श्री. विपुल भोपळे यांनी केले. या वेळी उपस्थित धर्मप्रेमींना समितीच्या विविध उपक्रमात सहभागी होण्यासाठी विचारणा केली असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

१. हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे ‘आदर्श हिंदु राष्ट्र संघटकासाठी कोणते गुण आवश्यक आहेत ?’, याविषयी म्हणाले, ‘‘हिंदु राष्ट्र संघटकामध्ये वक्तशीरपणा आणि प्रसिद्धीपराङ्मुखता या गुणांसमवेत बोलण्यामध्ये नम्रता जपणे आवश्यक आहे. याचसमवेत गुणांचे संवर्धन होण्यासाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवली पाहिजे.’’

२. सौ. विजया वेसणेकर यांनी ‘कोरोना महामारीच्या काळातही ‘ऑनलाईन’च्या माध्यमातून धर्मप्रसाराचे कार्य कसे वेगाने चालू आहे’, याविषयी सांगितले. तसेच समितीचे श्री. प्रसाद कुलकर्णी यांनी विविध ‘ऑनलाईन’ उपक्रमांची माहिती देऊन कोरोना महामारीच्या काळात अनेक मंदिरे, रुग्णालये आणि अन्य ठिकाणी नामजप लावल्यावर त्याचा कसा लाभ झाला ? ते विशद केले.