कोरोना रुग्णांनी वाढीव देयकासंदर्भात पुणे महापालिकेशी संपर्क साधण्याचे आरोग्य विभागाचे नागरिकांना आवाहन !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

पुणे, १३ जून – शासकीय आदेशानुसार कोरोनाकाळात रुग्णांकडून अतिरिक्त देयक आकारलेल्या रुग्णालयांच्या देयकांचे लेखापरीक्षण महापालिकेच्या वतीने केले जाणार आहे. देयकाविषयी तक्रार असलेल्या व्यक्तींनी महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. देयकांच्या लेखापरीक्षणासाठी महापालिकेने ३० रुग्णालयांत आपले कर्मचारी नियुक्त केले आहेत. या व्यतिरिक्त भरारी पथकेही सिद्ध करण्यात आली आहेत. राज्य सरकारच्या निर्देशांनुसार २ मार्चपासूनच्या सर्व देयकांचे लेखापरीक्षण केले जाणार आहे.

पालिकेच्या साहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. मनीषा नाईक यांनी सांगितले की, गेल्या वर्षीपासून ३ जूनपर्यंत वाढीव देयक आकारणीसंदर्भात आमच्याकडे २२२ तक्रारी प्रविष्ट झाल्या. लेखापरीक्षणानंतर त्यातील ८९ तक्रारींत तथ्य आढळले नसल्याने त्या निकाली काढण्यात आल्या. २६ प्रकरणांमध्ये वाढीव रक्कम परत करण्यात आली आहे.