पारंपरिक पौष्टिक आहारच सात्त्विक !

आहार सेवन आणि पचन यांमध्ये चार घटक कार्य करतात. ते म्हणजे मन, रसना (जीभ), अग्नी आणि जठर (आमाशय). या सर्व घटकांचा विचार करून समतोल आणि आवश्यक आहार सेवन करावयास हवा; मात्र सध्या आहाराच्या पौष्टिकतेपेक्षा चविष्टतेकडेच लोकांचा जास्त कल दिसून येतो. त्यामुळे जठर आणि अग्नी यांचा विचार न होता केवळ मन अन् रसना यांचाच विचार होतो. अशा आहाराचे सेवन केल्यास तो आहार प्राणशक्ती न देता शरिरात आम (त्रासदायक शक्ती) निर्माण करतो. ही त्रासदायक शक्ती अपान वायूद्वारा मस्तिष्कापर्यंत जाऊन आपल्याला त्रास देते.

अग्नीमांद्यात (भूक नसतांना) जड आहार घेतल्याने आमदोषांची निर्मिती होणे

‘शरिरातील अग्नी जर मंद झाला असेल, तर हलका आहार घ्यावा. अग्नीमांद्यात वातूळ, जड, तेलकट अन्नपदार्थ ग्रहण केल्यास अग्नी आणखी दुर्बल होऊन शरिरात आमदोषांची (अपचन होऊन विषासमान बनलेल्या घटकांची) निर्मिती होऊन त्रासदायक शक्ती निर्माण होते.

समतोल आहारामुळे अन्नपचन होऊन प्राणशक्ती वाढते, तर असमतोल आहारामुळे अपचन होऊन अपान वायूची विकृती होऊन त्रासदायक शक्ती निर्माण होते !