एका वेगळ्या दृष्टीकोनातून ‘स्थानमाहात्म्य’ या शब्दाचे उमगलेले काही गूढ आणि बोधप्रद अर्थ !

आपण ‘स्थानमाहात्म्य’ हा शब्द बहुतेक वेळा आध्यात्मिक अर्थाने वापरतो. उदाहरणार्थ एखादे देवस्थान, तीर्थक्षेत्र यांचे स्थानमाहात्म्य, तसेच संतपुरुषांच्या वास्तव्याचे स्थान, मठांचे स्थानमाहात्म्य आदी. ‘स्थानमाहात्म्य’ या शब्दावर काहीसे सखोल चिंतन करतांना मला त्यात उमगलेले काही गुढार्थ अन् बोधप्रद असे अर्थ लक्षात आले.

श्री. दत्तात्रय र. पटवर्धन

१. ती ती गोष्ट त्या त्या स्थानी असणे आणि तिथे ती शोभून दिसणे, हे एक वेगळ्या दृष्टीने स्थानमाहात्म्य !

एखादी गोष्ट त्या त्या स्थानी असली की, तिचे माहात्म्य आणि महत्त्व वाढते किंबहुना ती त्या विशिष्ट स्थानीच शोभून दिसते. असे हे वेगळे स्थानमाहात्म्य आहे. उदाहरणार्थ चराचरात व्यापून राहिलेला देव हा स्थुलातून मंदिरात, देव्हार्‍यात आणि सूक्ष्मातून हृदयमंदिरातच शोभून दिसतो. टोपी डोक्यावर, नथ नाकात, कुंकूमतिलक भालप्रदेशी, फुले देव आणि सत्पुरुष यांच्या चरणी किंवा सुवासिनी स्त्रियांच्या केशकलापात शोभून दिसतात. रांगोळी देव्हार्‍यासमोर किंवा अंगणात शोभून दिसते अन् अगदी खालच्या स्तरावर सांगायचे झाले, तर पायपुसणे हेसुद्धा त्याच्या विशिष्ट ठिकाणी शोभून दिसते. म्हणजे ती ती गोष्ट किंवा वस्तू त्या त्या स्थानी आणि तिथे ती शोभून दिसणे, हे एक वेगळ्या दृष्टीने म्हणजे व्यापक अर्थाने असणारे स्थानमाहात्म्यच होय !

२. गोष्टींचे स्थान पालटले, तर त्या अर्थशून्य ठरणे !

अधिक विचार करता असा एक विचार आला की, यांचे स्थान पालटले तर काय होईल ? अर्थात्च सारे विसंगत, विफल, विपरीत म्हणजेच अर्थशून्य होईल. उदाहरणार्थ ‘शून्य’ हे एखाद्या संख्येच्या पुढे लिहित गेलो, तर ते प्रत्येक वेळी १० पटींनी त्या संख्येची किंमत वाढवते; पण तेच शून्य संख्येच्या मागे लिहिले, तर कितीही शून्ये लिहिली तरी त्याचे स्थान पालटल्यामुळे म्हणजेच चुकीच्या स्थानी लिहिल्यामुळे ती अर्थशून्य ठरतात.

३. स्थानमाहात्म्य न जाणल्याने देशाची झालेली स्थिती

या चिंतनातून असा एक संकेत सहज प्राप्त होतो की, आज आपल्या देशाची किंबहुना विश्वाची स्थिती वर उल्लेख केल्याप्रमाणे विसंगत, विफल, विपरीत म्हणजेच अर्थशून्य झाली आहे. याला कारण त्या त्या स्थानी ती ती वस्तू नसणे. आज एकूण सर्वच क्षेत्रांत काही किरकोळ अपवाद वगळता पायपुसण्याने टेबलावर असणे आणि टेबलावर असणार्‍या कापडाने (टेबल क्लॉथ) पायपुसण्याची जागा घेणे, अशी भयावह आणि गंभीर स्थिती झाली आहे. उदाहरणार्थ प्रशासनातील पदांवर केवळ गुणवत्ता हाच निकष लावून व्यक्तीची नियुक्ती न होता; जात, धर्म, शिफारस, या आधारे नियुक्ती होणे, धर्माच्या संदर्भातील निर्णय आध्यात्मिक अधिकारी व्यक्तींना तो घेण्यास न सांगता राजकारण्यांनी घेणे किंवा न्याययंत्रणेने घेणे आदी. यावर केवळ आणि केवळ ‘हिंदु राष्ट्र’ हाच एकमेव पर्याय आणि उपाय आहे.

– श्री. दत्तात्रय र. पटवर्धन, कुडाळ, सिंधुदुर्ग