विरार (जिल्हा पालघर) येथील सनातनच्या साधिका सौ. सुनीता राजपूत (सौ. कोळी) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे २९ डिसेंबर २०२० या दिवशी सनातनच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी घोषित केले. सौ. राजपूत यांच्याविषयी सौ. स्नेहल गुरव यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. कष्टमय जीवन
‘सौ. सुनीता कोळी लहानपणापासूनच देवाची भक्ती करतात. त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यावर त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली. केवळ २ रुपयांसाठीसुद्धा त्यांना बंदरावर जाऊन काम करावे लागायचे. अशा बिकट परिस्थितीत त्यांचा विवाह झाला; परंतु लग्नानंतर काही वर्षांतच त्यांचे पती त्यांना सोडून गेले. त्यांना झालेले बाळही आठ मासांचे असतांना गेले. त्यानंतर मासे विकून त्या स्वतःचा उदरनिर्वाह करू लागल्या. सौ. कोळी यांचा मासे विकण्याचा व्यवसाय आहे. त्या आठवड्यातून ३ दिवस बाजारात जाऊन मासे विकतात.
२. नीटनेटकेपणा
मासे विकण्याचा व्यवसाय असूनही सौ. कोळी यांचे घर पुष्कळ स्वच्छ आहे. त्या त्यांचे घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवतात.
३. व्यष्टी साधना
अ. त्या पहाटे ५ वाजता उठून नियमितपणे नामजप करतात.
आ. त्या सतत ‘जीवदानीदेवी’ आणि परात्पर गुरुदेव यांच्याशी मानसरित्या बोलतात.
इ. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये साधकांसाठी आलेल्या सूचना त्यांना सांगितल्यावर त्या लगेच त्यात सांगितल्यानुसार नामजपादी उपाय आणि नामजप करतात.’
४. त्या म्हणतात, ‘‘माझ्या नशिबात जे सुख नव्हते, त्या सुखाचा विचार कशाला करायचा ?’’
५. घरातील अडचण असो किंवा साधकांमधील असो, त्या कुठल्याही प्रसंगात अडकून रहात नाहीत. त्यांना एकदा समजावून सांगितल्यावर त्या लगेच त्या प्रसंगातून बाहेर येतात आणि तशी कृती करतात.
६. सेवेची तळमळ
अ. काम करतांनाही त्यांना जे भेटतील, त्यांना त्या नामजपाविषयी माहिती सांगतात.
आ. त्यांना व्यवसायासाठी मीरारोड येथून गोरेगावला जावे लागते. मीरारोड ते गोरेगाव या प्रवासात त्या लोकांना ‘सनातन पंचांग’ दाखवून त्यांचे वितरण करतात.
इ. त्यांना कुठेही सेवेला बोलावले, तरी त्या कधीच ‘नाही’ म्हणत नाहीत.
ई. सौ. कोळी यांचे शिक्षण झालेले नाही. त्यामुळे त्यांना लिहिता-वाचता येत नाही, तरी त्या प्रसारात माहिती सांगतांना घाबरत नाहीत. भगवंतावर श्रद्धा ठेवून जसे जमेल, तसे समोरच्या जिज्ञासूला त्या तळमळीने माहिती सांगतात.
७. श्रद्धा
७ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि ‘जीवदानी’ देवीमाता यांच्यावरील दृढ श्रद्धेमुळे कठीण परिस्थितीतही साधिकेला ‘आपण एकट्या आहोत’, असे कधी न जाणवणे : सौ. कोळी यांचे प्रारब्ध पुष्कळ कठीण होते; परंतु कितीही कठीण परिस्थिती आली, तरी त्यांची देवावरील श्रद्धा कधीही डळमळीत झाली नाही. त्या नेहमी म्हणतात, ‘माझी गुरुमाऊली माझ्या समवेत आहे आणि माझी ‘जीवदानी’ देवीमाता माझे रक्षण करते. गुरुदेव माझी सतत काळजी घेतात. ‘माझा देव मला साधक आणि इतर लोक यांच्या माध्यमातून सतत साहाय्य करतो’, असे मी अनुभवते; म्हणून मला ‘मी एकटी आहे’, असे कधी वाटत नाही.’’
८. भाव
८ अ. सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी साधिकेला स्वत:चा संपर्क क्रमांक देऊन ‘कधीही काही अडचण आल्यास संपर्क करा’, असे सांगणे, ते ऐकून त्यांची पुष्कळ भावजागृती होणे आणि ‘सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या स्मरणानेच अडचणी सुटतात’, असे सांगणे : सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांची त्यांना पुष्कळ आठवण येते. याविषयी त्यांनी एक प्रसंग सांगितला, ‘‘एकदा मी सेवाकेंद्रात गेले होते. तेव्हा मला सद्गुरु अनुताईंनी स्वतःचा संपर्क क्रमांक दिला आणि मला म्हणाल्या, ‘‘कधीही संपर्क करावासा वाटला, तर मला भ्रमणभाष करू शकता.’’ तो प्रसंग आठवून त्यांची पुष्कळ भावजागृती होते. त्या म्हणाल्या, ‘‘मी साधनेचे अधिक प्रयत्न करत नाही, तरीही माझ्या देवीने, आईने (सद्गुरु अनुताईंनी) मला स्वतःचा संपर्क क्रमांक दिला. त्या माझी किती काळजी करतात ! मी सद्गुरु अनुताईंना कधी भ्रमणभाष केला नाही; कारण त्यांच्या आठवणीनेच माझ्या अडचणी सुटतात !’’ (‘सौ. कोळी एकट्या रहातात’, हे कळल्यावर ‘त्यांना काही अडचण आल्यास साहाय्य मिळावे’, यासाठी सद्गुरु अनुताईंनी त्यांना त्यांचा संपर्क क्रमांक दिला होता.’ – संकलक)
– सौ. स्नेहल गुरव, परळ, मुंबई. (नोव्हेंबर २०२०)