कोरोनासेवा उपक्रमांत टक्केवारी घेण्यात लोकप्रतिनिधींना रस ! – परशुराम उपरकर, नेते, मनसे

परशुराम उपरकर

कणकवली – कोरोनाला हद्दपार करण्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना कोरोना सेवा उपक्रमांतील मलिदा खाण्यात, टक्केवारी घेण्यात अधिक रस आहे. कोरोनाच्या निर्मूलनासाठी त्यांच्याकडून कोणतीही ठोस कार्यवाही केली जात नाही. केवळ दिखाऊपणे उद्घाटने केली जात असल्याचा आरोप मनसेचे नेते परशुराम उपरकर यांनी केला आहे.

याविषयी उपरकर पुढे म्हणाले की,

१. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर विनामूल्य उपचार करायचे आहेत, तरीही रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे घेतले जातात. एवढेच नव्हे, तर वन अधिकार्‍यांकडून मृतदेह जाळण्यासाठी विनामूल्य लाकडेही घेण्यात आली आहेत.

२. मृतदेह जाळण्यासाठी ठेका देण्यात आला आहे. त्याचे ४५ लाख रुपये खर्चाचे देयक अद्याप प्रलंबित आहे. ठेका घेतलेला एक साधा कंत्राटदार ४५ लाख रुपये खर्च करूनही शांत रहातो, याचाच अर्थ तो नामधारी असून मृतदेह जाळण्याचा ठेका कुठल्यातरी मोठ्या पदाधिकार्‍यानेच घेतला असण्याची शक्यता आहे.

३. कुडाळ येथे ऑक्सिजन प्रकल्पाचे उद्घाटन झाले; मात्र त्यामध्येही काही लोकप्रतिनिधींची भागीदारी असण्याची दाट शक्यता आहे. एकूणच जनतेलाही आता लोकप्रतिनिधी कोरोना काळातही राजकारण करतात, टक्केवारी घेतात हे कळून चुकले आहे.

४. पालकमंत्री उदय सामंत यांनी कणकवलीसाठी शववाहिनी देण्याची घोषणा केली; मात्र अद्याप ती दिली नाही. खनिकर्म विभागाकडून जिल्ह्यासाठी रुग्णवाहिका देण्यात आल्या; मात्र पासिंग झाले नसल्याने त्या जिल्ह्याच्या बाहेर जाऊ शकत नाहीत.

५. राज्यशासनाने कोरोना रुग्णावर उपचार करणार्‍या खासगी रुग्णालयांसाठी दर निश्‍चित केले आहेत; मात्र त्याची कार्यवाही होत नसून आजही रुग्णांची लूट होत आहे. या सर्व समस्यांवर उपाययोजना करण्याऐवजी पालकमंत्री आणि इतर लोकप्रतिनिधी केवळ उद्घाटने करण्यात गुंग आहेत.