‘फ्रेंच राज्यक्रांतीचे प्रणेते रूसो यांनी ‘तुमच्या देशातील युवकांच्या ओठांवर कोणती गाणी आहेत ?’, ते मला सांगा. मी तुमच्या देशाचे भवितव्य सांगतो’, असे उद्गार काढले होते. रूसो यांचे विधान कोणत्याही कसोटीवर पडताळून पाहिल्यास त्याची सत्यता पटते. या कसोटीला देश, काल, स्थिती आदी कशाचेही बंधन नाही. आजचा युवक हा देशाचा आधारस्तंभ असल्याने तो कार्यक्षम, देशप्रेमी आणि संस्कारक्षम असला पाहिजे. त्याच्या बालपणी त्याच्यावर केलेले आणि झालेले संस्कार भावी जीवनावर दूरगामी परिणाम करणारे असतात. आजचा युवक व्यसनाधीन, दायित्वशून्य, संस्कारहीन आणि शारीरिक दृष्टीने शक्तीहीन असल्याने स्वातंत्र्य संग्रामातील युवकांच्या पार्श्वभूमीवर ‘तो कसा आहे ?’, हे पहाणे काळाची आवश्यकता आहे. आजही देश एका मोठ्या परिवर्तनाच्या सत्रातून जात आहे. देशातील भ्रष्टाचार, गुन्हे, गरिबी, हिंदूंवरील घोर अन्याय, स्त्रियांवरील अत्याचार आदी समस्या संपवण्यासाठी, येथे राज्यव्यवस्थेचा आदर्श प्रस्थापित करण्यासाठी, देशातील जनतेला सुखी आणि समाधानी करण्यासाठी देशातील युवकांनी संघटित होऊन एकजुटीने राष्ट्रकार्याला समर्पित झाले पाहिजे; परंतु युवक जर साधना करणारे, धर्माचरण करणारे असतील, तरच त्यांच्याकडून आदर्श राज्यव्यवस्था निर्माण केली जाऊन ती सांभाळली जाऊ शकते ! भारताला स्वतंत्र करण्यासाठी ज्या राष्ट्रप्रेमाने युवक भारित झाले होते, तशाच तळमळीने आणि प्रेरणेने युवक राष्ट्रहितासाठी सर्वस्व झोकून देऊन प्रयत्न केले, तर भारत पुनश्च वैभवाच्या शिखरावर जाण्यास वेळ लागणार नाही ! यासाठी स्वातंत्र्यपूर्वकाळातील देशकार्याला वाहून घेतलेल्या युवकांची गुणवैशिष्ट्ये जाणून घेणे आवश्यक आहे !
– लेखक प्र.दि. कुलकर्णी, पंढरपूर
स्वातंत्र्य-संग्रामातील युवकांची वैशिष्ट्ये !
१. ‘देश हा देव असे माझा’, ही धारणा असलेला आणि मायभूच्या सुटकेसाठी कटिबद्ध असल्याने ‘स्वातंत्र्य’ ‘स्वातंत्र्य’ आणि ‘स्वातंत्र्य’ हेच ध्येय असलेला ! : स्वातंत्र्य संग्रामातील युवक स्वातंत्र्य प्राप्तीच्या ध्येयाने पछाडलेला होता. ‘देश हा देव असे माझा’, ही त्याची धारणा होती. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी, आगरकर, भगतसिंह, चापेकर बंधू, राजगुरु, सेनापती बापट आदी त्या काळातील युवक देशभक्तीच्या ध्यासाने आपले प्राण तळहातावर घेऊन भारतमातेच्या विमोचनार्थ कटिबद्ध झाले होते. ते शत्रूच्या शिबिरात जाऊन सिंहगर्जना करत होते. स्वातंत्र्य संग्रामातील प्रत्येक युवक देशभक्तीने ओथंबलेला होता. त्याच्या नसानसांतून राष्ट्रभक्तीचे उष्ण रक्त वहात होते. या युवकांनी मायभूच्या सुटकेचा ध्यास घेतला होता. त्यांनी सोन्याचा धूर निघत असणारी आणि सुजलाम् आणि सुफलाम् असणारी मातृभूमी परदास्याच्या शृंखलेतून सोडवण्याचा विडा उचलला होता. यास्तव ते प्रसंगी सर्वस्वावर विस्तव ठेवून आणि धर्मपत्नीचे कुंकू पुसून घरातून बाहेर पडले होते. ‘वेडात दौडले वीर मराठे सात’, अशी त्यांची अवस्था होती. ‘स्वातंत्र्य’ ‘स्वातंत्र्य’ आणि ‘स्वातंत्र्य’ हेच त्यांचे ध्येय होते.
२. ‘स्वदेशीचा प्रचार आणि प्रसार’ हा मूलमंत्र असल्यामुळे पारंपरिक पोषाखाचा सार्थ अभिमान बाळगणारा ! : स्वातंत्र्याप्रमाणेच त्यांनी ‘स्वदेशीचा पूर्ण प्रचार आणि प्रसार’ यांचे कंकण हाती बांधले होते. तो त्यांचा मूलमंत्रच होता. ते सर्व जण विदेशी कापडाची आणि कपड्यांची होळी करून इंग्रज सत्तेला पदच्यूत करण्यास्तव शपथबद्ध झाले होते. लोकमान्य टिळकांच्या समर्थ नेतृत्वाखाली सावरकरांनी केलेली परदेशी कापडांची होळी पाहून परकीय सत्तेचे नेत्र दीपले आणि त्याची धग पुण्यापासून लंडनपर्यंत पोेचली होती. स्वदेशीचा केवळ पुरस्कार करून ही युवक मंडळी थांबली नव्हती; तर ते सर्व जण प्रत्यक्ष स्वदेशीचा वापरही करत होते. ही युवक मंडळी पारंपरिक पोषाखाचा सार्थ अभिमान बाळगणारी होती.
३. देशाच्या स्वातंत्र्यास्तव प्राणार्पण करणारे प्रखर देशभक्त हेच आदर्श असलेला ! : स्वातंत्र्य संग्रामातील युवकांसमोर भगवान श्रीकृष्ण, राणा प्रतापसिंह, छत्रपती शिवाजी महाराज यांचे, तसेच देशाच्या स्वातंत्र्यास्तव प्राणार्पण करणार्या प्रखर देशभक्त यांचे आदर्श होते. देशभक्तीने ओथंबलेले साहित्य त्यांच्या नित्य वाचनात होते. उत्तमोत्तम आदर्श नेते समोर असल्याने त्यांच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न ते करत होते.
४. ‘मेकॉले’ची शिक्षणपद्धत झुगारून राष्ट्रभक्तीने भारलेले शिक्षण घेणारा ! : तत्कालिन युवकांत ‘राष्ट्रीय शिक्षण संस्थे’तून शिक्षण घेण्यासाठी कमालीची स्पर्धा होती. परकीय शिक्षण संस्थेतून परकीय विचारांचे शिक्षण घेण्यापेक्षा राष्ट्रीय शाळेतील राष्ट्रभक्तीने भारलेले शिक्षण घेणे, ही त्यांची जिद्द होती. त्या काळात मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीनुसार शिक्षण घेऊन गुलाम आणि कारकून बनण्यापेक्षा राष्ट्रीय शाळेत शिक्षण घेऊन ‘राष्ट्रप्रेमाने ओथंबलेला युवक’ बनणे, केव्हाही श्रेष्ठ समजले जात असे. परिणामी त्यांचा ओढा तिकडेच होता.
५. बलदंड शरीरयष्टी होण्यासाठी कष्ट घेणारा आणि हाता-पायांतील लोखंडी बेड्या गुलाब पुष्पाप्रमाणे मिरवण्यात भूषण वाटणारा ! : त्यांनी ‘स्वातंत्र्य’ हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवल्याने शरीरप्रकृती उत्तम व्हावी, यांसाठी त्यांचे प्रयत्न असत. बलदंड आणि दणकट शरीरयष्टीमुळे ते युवक विविध आंदोलनांत धडाडीने उडी घेत. त्यांच्यात न्यायाधिशाने अन्यायाने दिलेल्या शिक्षा मजबूत मनगट आणि खंबीर मनोबळ यांद्वारे हसत हसत भोगण्याची कुवत होती. ‘वंदे मातरम्’, ‘भारतमाता की जय’, ‘इन्किलाब जिंदाबाद’ या आणि यांसारख्या स्फूर्तीदायक घोषणा देण्याचे सामर्थ्य त्यांच्यात होते. त्यांना हाता-पायातील लोखंडी बेड्या गुलाब पुष्पाप्रमाणे मिरवण्यात भूषण वाटत होते. धार्मिक वृत्ती, सदाचारी वागणूक आणि बलिष्ठ देह यांमुळे फाशीला जातांनाही हाती ‘गीता’ घेऊन हसतमुखाने पुढे पुढे जाण्याची स्पर्धा होती.
६. प्रसंगी शिक्षण अर्धवट सोडून देशभक्तीची प्रखर ज्योत सतत तेवत ठेवण्याचे महान कार्य करणारा ! : स्वातंत्र्य संग्रामातील युवक अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा आणि सत्यास्तव झगडणारा होता. या युवकाने राजकारणात भाग घेतला होता, तो केवळ देशहितास्तव ! प्रसंगी शिक्षण अर्धवट सोडून स्वातंत्र्य संग्रामात उडी घेणारे असंख्य युवक त्या काळी होते. परिणामी त्यांचे शिक्षण जरी अर्धवट राहिले; पण देशभक्तीची प्रखर ज्योत सतत तेवत ठेवण्याचे महान कार्य त्यांनी केले.
७. साहसी वृत्ती आणि देशास्तव भव्यदिव्य करण्याची मनोमन तळमळ असल्याने मातृभूमीला पारतंत्र्यातून मुक्त करून रामराज्याप्रमाणे गत वैभवाप्रत नेण्यासाठी सिद्ध असलेला ! : या युवकांना साहसाची, तसेच देशास्तव काहीतरी भव्यदिव्य करण्याची मनोमन तळमळ होती. ज्येष्ठ क्रांतीकारकांची व्याख्याने श्रवण करावीत. त्यांची टीपणे काढावीत. अग्रलेख पाठ करावेत. नेमबाजीचे शिक्षण घ्यावे, अशा कोणत्याही मार्गाने मातृभूमीला मुक्त करावे, हेच त्यांचे ध्येय होते. त्यांची देशाच्या वैभवशाली भूतकाळाच्या पायावर, वर्तमानाचा कठोर हात पकडून, उदात्त आणि विशाल अशा भविष्यकाळावर स्वार होण्याची पूर्ण सिद्धता केली होती. प्राचीन वैभवशाली भूतकाळाचा, तसेच परंपरेचा सार्थ अभिमान उरी बाळगून, कृषिप्रधान देशाला पुनःश्च रामराज्याप्रमाणे परम वैभवाप्रत नेण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
कुठे राष्ट्रप्रेमाने भारलेले आणि भारतमातेसाठी प्राणार्पण करणारे स्वातंत्र्य संग्रामातील तेजस्वी युवक अन् कुठे दिशाहीन, व्यसनांच्या अधीन झालेले आणि राजकारण्यांच्या हातातील बाहुले बनलेले आजचे निस्तेज युवक !