आजच्या युवकांच्या दयनीय स्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजना !

१. स्वावलंबी होऊन स्वतःचा व्यवसाय चालू करणे

आजच्या युवकाने पदवीच्या कागदांची भेंडोळी हाती घेऊन कार्यालयाची दारे ठोठावण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय चालू करावा. त्याने काम करतांना श्रेष्ठ अथवा कनिष्ठ मानू नये. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणत, ‘माझ्या विद्यापिठातील पदवीधर वातानुकूलित कार्यालयात जसा रमेल, तसाच तो गोठ्यातील शेण काढतांनाही रमेल.’ त्यांचे हे विधान आजचा युवक पूर्ण विसरला आहे.

२. देशाची सेवा करण्यास्तव सैन्यात भरती होणे

स्वामी विवेकानंद एके ठिकाणी म्हणतात, ‘आजच्या युवकांना देशाला कसे वळण लावावे, याऐवजी केसाला कसे वळण लावावे ?’, याची चिंता अधिक आहे. शिक्षण पूर्ण होताच त्यांनी अंतर्मुख बनून देशाची सेवा करण्यास्तव सैन्यात भरती झाले पाहिजे. ‘देशाने मला काय दिले ?’, यापेक्षा मी देशाला काय देऊ शकतो ?’, याचा विचार केला पाहिजे.’

३. समाजतज्ञ आणि विचारवंत यांनी आज ‘युवक असा का बनला ?’, याचा अंतर्मुख होऊन विचार करणे आवश्यक !

कुटुंबातील, तसेच समाजातील तज्ञ, विचारवंत, राजकारणी आदींनी आज ‘युवक असा का बनला आहे ?’, याचा विचार केला पाहिजे. त्यांना त्यांच्या हक्कापेक्षा कर्तव्याची जाणीव करून दिली पाहिजे. आपण आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. सर्वच दोष युवकांना देऊन आपल्याला मुक्त होता येत नाही. क्रिया अन् प्रतिक्रिया एकमेकांवर अवलंबून असल्याने थोरा-मोठ्यांचे आचरण पाहून युवक आपले आचरण करत असतात. ‘युवक का बिघडला ?’, याचे चिंतन करून त्यावर समर्थ उपाययोजना केली पाहिजे.’

– प्र.दि. कुलकर्णी, पंढरपूर, जि. सोलापूर.