आदर्श राष्ट्रनिर्मितीसाठी संस्कारहीन नव्या पिढीला सुसंस्कारित करणे, हे सर्वांचे नैतिक कर्तव्यच ! 

१. संस्कारहीनतेच्या संकटाने नव्या पिढीला चोहोबाजूंनी घेरलेले असणे

भारतीय संस्कृती ही चरित्र आणि संस्कार यांची जननी आहे. सध्या भौतिकवाद आणि विकास यांच्या स्पर्धेत मात्र आपण मानवी मूल्यांना मागे सोडले आहे. सध्याच्या विज्ञानयुगाची संपन्नता आपल्यासमोर शाप बनून उभी राहिली आहे. ज्या वस्तूंमध्ये आपण भौतिक सुख पहातो, त्या वस्तू आपल्या विनाशाचे कारण बनत आहेत. नव्या पिढीला संस्कारहीनतेच्या संकटाने चोहोबाजूंनी घेरलेले आहे.

२. मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी साहाय्यक असणारे घटक आणि माता-पित्यांचे दायित्व

मन, वाणी आणि कर्म यांच्या पावित्र्यासाठी सुसंस्कारांना आत्मसात करणे, हे आपल्या सर्वांचे नैतिक कर्तव्य आहे. बाल्यावस्थेपासून किशोरावस्थेपर्यंतची अवस्था अधिक संवेदनशील असते आणि याच अवस्थेत चारित्र्य निर्माण होत असते. चारित्र्य निर्मितीची प्रक्रिया किशोरावस्थेत पूर्ण होते. त्यामुळे एकत्र कुटुंबव्यवस्था, आपलेपणा, प्रेम, तसेच योग्य मार्गदर्शन आणि माता-पिता चारित्र्यवान असणे अन् त्यांच्यातील सद्गुण हे सर्व घटक मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी साहाय्यक असतात. शिस्त, त्याग, कर्मठपणा आणि दृढ संकल्प या यशाच्या पायर्‍या आहेत. यशाची एकेक पायरी चढल्याने चांगले व्यक्तित्व निर्माण करता येते.

३. माता-पित्यांनी मुलांना सुसंस्कारी आणि स्वावलंबी बनवण्यासाठी धनसंचय करणे अन् मुलांना सुखसुविधा देणे, यांविषयी योग्य निर्णय घेणे अपेक्षित असणे

अनैतिकतेने कमावलेल्या संपत्तीमुळे मुलांच्या भावनांना विषयासक्त होतात. त्यामुळे माता-पिता दोघांनीही प्रामाणिकपणे परिश्रम करून कमवलेले धन मुलांचे मार्गदर्शन करू शकते. आवश्यकतेपेक्षा अधिक सुख-सुविधा या मुलांसाठी वरदान नसून शाप असतात; कारण त्या मुलांना स्वावलंबी बनण्यात अडथळा उत्पन्न करतात.

– (संदर्भ : ‘संस्कारम्’ जुलै, २०१३)