तरुणांनो, खरे राष्ट्रप्रेमी व्हा !

कुठे देशाच्या स्वातंत्र्यासाठी हातात तिरंगा घेऊन क्रांतीकारकांनी काढलेल्या स्फूर्तीदायी फेर्‍या, तर कुठे आताच्या तरुण पिढीने स्वातंत्र्यदिनाला दुचाकींवरून काढलेल्या फेर्‍या !

प्रतिकात्मक छायाचित्र

‘आम्ही देशप्रेमी आहोत’, हे दाखवण्यासाठी एरव्ही वर्षभरात देशप्रेमाचा लवलेशही न जाणवणारा काही तरुणवर्ग १५ ऑगस्टला दुचाकींवरून हातात तिरंगा घेऊन फेर्‍या काढतांना दिसला. या फेर्‍या काढतांना देण्यात येणार्‍या घोषणांची पद्धत तर एवढी विचित्र होती की, ते घोषणा देत आहेत कि किंचाळत आहेत, हेच समजत नव्हते. आजच्या तरुणपिढीमध्ये देशप्रेमाचा किती अभाव आहे, हे लक्षात येते.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी क्रांतीकारकांनी आणि देशभक्तांनी हातात तिरंगा घेऊन गावोगावी पायी चालत उत्स्फूर्तपणे फेर्‍या काढल्या. त्या वेळच्या फेर्‍यांमध्ये एवढे सामर्थ्य होते की, ब्रिटीश साम्राज्यही हादरून जायचे. या क्रांतीकारकांनी याच तिरंग्याच्या रक्षणासाठी आपले बलीदानही दिले; मात्र आजच्या तरुण पिढीची स्थिती नेमकी उलट आहे. काही ठिकाणी दुचाकींवरून काढलेल्या फेर्‍यांमधून, तर असे चित्र पहायला मिळाले की, हातात तिरंगा ध्वज घेऊन तो कसाही फिरवला जात होता. ‘हा तिरंगा म्हणजे आपल्या देशाची शान आहे, याचे भानच आजच्या तरुणांना राहिलेले नाही’, असेच वाटत होते.

यावरून प्रकर्षाने एक गोष्ट लक्षात आली की, स्वातंत्र्योत्तरकाळात एकाही राज्यकर्त्याने जनतेला देशप्रेम शिकवले नाही. परिणामी आजच्या तरुण पिढीमध्ये देशप्रेम नाही. याचे कारण हे की, आजचे शासनकर्ते आणि जनता क्रांतीकारकांना विसरली आहे. हा कृतघ्नपणा नव्हे का ? – एक राष्ट्रप्रेमी