पाल्यांना आत्मघातापासून वाचवण्यासाठी महापुरुषांचे आदर्श आणि धर्माचरण शिकवा !

मुले ही मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात, त्याला जसा आकार देऊ तशी मूर्ती त्यातून घडते. यासाठी मुलांना घडवण्यात पालकांसह समाजाचाही फार मोठा वाटा असतो. समाजातील प्रतिभावंत लोकांचा मनावर प्रभाव पडत असतो, तसाच गैरकृत्ये करणार्‍यांचाही पडत असतो. काही पालक लहानपणापासूनच मुलांना इतक्या सोयीसुविधा आणि चैनीच्या वस्तू उपलब्ध करून देतात की, मुलांना त्याची सवय होऊन ती मूलभूत आवश्यकता होऊन बसते. मग एखाद्या वेळेस समजा ही अनावश्यक गरज भागवली गेली नाही किंवा पालकांनी काही बंधने घातली, तर ‘पालक आपल्यावर अन्याय करत आहेत’, असे वाटते. पालकांविषयी मुलांच्या मनात द्वेषभावना निर्माण होते. अशी मुले आत्महत्याही करतात.

या सर्व घटनांना आळा घालण्यासाठी मुलांवर लहानपणापासूनच सुसंस्कार करणे हा एकमेव पर्याय आहे. मुलांना आवश्यक त्या, तसेच माफक किमतीच्या वस्तूच द्यायला हव्यात. त्या वस्तूंची मुलांच्या जीवनात खरोखरच आवश्यकता आहे का, ते पहायला हवे. तसे नसेल, तर ती कशी नाही, हे त्यांना समजावून सांगायला हवे. त्यांचे लक्ष चंगळवादी गोष्टींतून अल्प होण्यासाठी त्यांच्या जीवनाला आणि मनाला संयमित जीवनाची शिस्त लावणे आवश्यक आहे. त्यासाठीच पाल्यांपुढे त्यांचे ध्येय सातत्याने ठेवायला हवे. मुलांच्या मनाची खंबीरता आणि सहनशीलता वाढण्यासाठी राष्ट्रपुरुष, देशभक्त अन् क्रांतीकारक यांचे जीवनपट साहाय्यक ठरतील. त्याच्या जोडीला भावी पिढीला हिंदु धर्मातील महान परंपरांचा पाठ घालून दिल्यास मुलांच्या आणि पर्यायाने राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचा प्रारंभ होईल, यात शंका नाही. मुलांना धर्माचरणाची सवय लावल्यास त्यांचे जीवन संयमित आणि सुसंस्कारित होण्यास साहाय्य होईल; परंतु त्यासाठी प्रथम पालकांनी तसे जीवनमान अंगीकारणे आवश्यक आहे.’

– सौ. प्रीती जाखोटिया, देहली (पूर्वाश्रमीची कु. ऋतुजा शिंदे, पुणे) (२२.१.२०१६)