सध्या युवा पिढी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे आहे. मागील पिढीपेक्षा युवा पिढी अधिक बुद्धीमान आणि गतीमान असल्याचेही वारंवार जाणवते; मात्र तरीही कित्येकदा धर्माचरण आणि साधना यांच्याअभावी त्यांच्यात चैतन्याचा अभाव जाणवतो.
‘करिअर’च्या मागे धावत असलेल्या तरुणांची दिनचर्या, आहार-विहार, पेहराव इतकेच नव्हे, तर विचारसरणीही पाश्चात्त्यांप्रमाणे झाली आहे. त्यांच्या जीवनाचे ध्येय पैसा कमावणे, विवाह, बंगला, गाडी आदी गोष्टींपर्यंत मर्यादित झाले आहे. अशा राष्ट्राच्या युवा पिढीसाठी गुरुदेव काटेस्वामीजी यांनी दिलेला पुढील संदेश लाखमोलाचा ठरेल !
कुठल्याही राष्ट्राचे भवितव्य त्याच्या युवा पिढीवरून ठरते. केवळ अर्थ आणि काम हे पुरुषार्थ युवा पिढीला तेजसंपन्न बनवू शकत नाहीत. धर्माने या पुरुषार्थांवर नियंत्रण मिळवणारे युवकच राष्ट्र घडवू शकतात.
१. धर्माचे नियंत्रण नसल्यास मानवाचे गिधाड होणे
‘अर्थ आणि काम पुरुषार्थांवर धर्माचे नियंत्रण अटळ आहे. तेच धर्माचे ध्येय आहे. ते डोळ्यांसमोरून हटले की, माणसाचे गिधाड होते. मग सत्य-असत्य, शुभ-अशुभ, सत्प्रवृत्ती-दुष्प्रवृत्ती, विधी-निषेध यांतील अंतर त्यांच्या लेखी संपून जाते.
२. युवकांनो, अशा मानवी गिधाडांचे पंख कापून समाजाचा विध्वंस थांबवण्यास सज्ज व्हा !
समाजातील गिधाडांचे पंख कापण्याचे साहस करणारे युवक जोवर पुढे सरसावत नाहीत, तोवर अधोगतीला आवर घातला जाणार नाही. मत्सरमूलक स्वार्थाच्या छुप्या वा उघड प्रवृत्तीविरुद्ध दंड थोपटून उभे राहिल्याविना समाजाचा विध्वंस थांबायचा नाही.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(संदर्भ : मासिक ‘घनगर्जित’, सप्टेंबर २००५)