युवकांनो, ‘लिव्ह इन रिलेशनशिप’सारख्या अनिर्बंध रूढी अंगीकारू नका !

असे तरुण समाजाचा किंवा राष्ट्राचा विचार करणे कधीतरी शक्य आहे का ?

प्रतिकात्मक छायाचित्र

सध्या समाजातील अनेक युवक-युवती ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये एकत्र रहातात. चित्रपटातील कलाकारांचे अंधानुकरण करून ही विकृती जोपासली जात आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे अगदी कोवळ्या वयातील मुलेही यास बळी पडत आहेत. दायित्व नको, विवाहाचे बंधन नको किंवा विवाहानंतर आपापसांत होणारे मतभेद नकोत, यासाठी आताची तरुणाई हा मार्ग निवडते. असे करतांना आपण चुकत आहोत, याची त्यांना ना जाणीव असते, ना कसले सामाजिक भान ! धर्मशास्त्रानुसार विधीपूर्वक विवाह करून कुटुंबसंस्था निर्माण करणे, हा विवाहाचा खरा हेतू आहे; मात्र ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये असणारे तरुण-तरुणी विवाह करतीलच, असे नाही. त्यामुळे हा एकूण प्रकार नैतिकतेला तिलांजली दिल्यासारखा आहे.

तारुण्याची होळी खेळणारे आजचे युवक !

आज राष्ट्र-धर्म संकटात असतांना ‘लिव्ह इन’च्या मागे भावनेच्या आहारी जाऊन युवा पिढी स्वत:च्या आयुष्याची माती करून घेत आहे. पूर्वी देश पारतंत्र्यात असतांना युवा क्रांतीकारक भारतमातेची सेवा करतांना प्रसंगी प्राणांचीही आहुती देत. मृत्यूला कवटाळून क्रांतीची होळी खेळत. आजचे युवक मात्र वासनेला बळी पडून तारुण्याची होळी खेळत आहेत. – कु. मधुरा चतुर्भुज, पुणे (४.८.२०१६)