‘वापरा आणि फेका’ हे तत्त्व वृद्ध आई-वडिलांच्या संदर्भात वापरणारी तरुण पिढी !

घरातील मोठ्यांचे महत्त्व न जाणणारी तरुण पिढी !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘वापरा आणि फेका (Use and Throw)’ ही जी पाश्चात्त्यांची आधुनिक संस्कृती आहे, ती आता अनेक तरुणांनीही आत्मसात केली आहे. त्यामुळे ज्या आई-वडिलांनी जन्म दिला, जन्मापासून स्वावलंबी होईपर्यंत सर्व तर्‍हेने काळजी घेतली, उदा. आजारपणात सर्व केले, शिक्षण दिले, त्यांच्याबद्दल कृतज्ञता न वाटता हल्लीचे आंग्लाळलेले तरुण आई-वडिलांना त्यांच्या म्हातारपणी ‘वापरा आणि फेका’ या पाश्चात्त्यांच्या आधुनिक संस्कृतीनुसार वृद्धाश्रमात पाठवतात किंवा त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. याचे पाप त्यांना जन्मोजन्मी भोगावेच लागणार आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

तरुणांना घरातील मोठ्या व्यक्तींचे महत्त्व लक्षात आणून द्यायची वेळ आली आहे !

असे तरुण समाजाचा किंवा राष्ट्राचा विचार करणे कधीतरी शक्य आहे का ?

विभक्त कुटुंबपद्धतीचा विपरित परिणाम मुलांवरही झाला आहे. देशाच्या भावी पिढीवर तो झाला आहे. घरात आजी-आजोबा अन्य नातेवाईक नसतात किंवा अल्प प्रमाणात असतात. तरुण मुलांनाही आई-वडील घरात अडगळ किंवा नकोसे वाटतात. मोठी माणसे घरात असल्यामुळे ज्या संयमाने वागावे लागते, बंधनात रहावे लागते, ते त्यांना नको आहे. लग्नाच्या वेळी काही मुली विचारतात, ‘घरात डस्टबीन (कचरापेट्या) किती आहेत ?’ ‘डस्टबीन’ म्हणजे वृद्ध माणसे ! हल्ली मुलींना घरात सासू सासरे नको असतात. मुलांनाही संसारात आई-वडील नको असतात. त्यांच्या अनुभवाचा लाभ, घरात असणारा मोठा आधार, त्यांच्याकडून होणारी प्रेमाची पाखर, नातवंडावर होणारे संस्कार या सार्‍याला तरुण पिढी मुकत आहे. पालकांप्रती आपले काही कर्तव्य आहे, याची जाण सध्याच्या तरुण पिढीला नाही. याविषयीचे संस्कार करण्यात कदाचित् त्यांचे पालकच न्यून पडले आहेत !