संभाजीनगर – कोरोना साथरोगाची दाहकता लक्षात घेऊन शहरातील ‘कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज’, ‘चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर’, ‘लघु आणि मध्यम उद्योगाची मासिआ’, तसेच ‘संभाजीनगर फर्स्ट’ या उद्योजकांच्या संघटनांनी ‘टीम ऑफ इंडस्ट्रीज असोसिएशन’ असा एक समूह सिद्ध करून वैद्यकीय पायाभूत सुविधांमध्ये मोठी वाढ केली. साहाय्य किती झाले यापेक्षाही उद्योग संघटनांनी एकत्र येऊन कसे नव्या पद्धतीने काम केले याची नोंद केंद्रशासनाच्या नीती आयोगाने घेतली आहे. या साहाय्याची ‘संभाजीनगर पद्धत’ आता चर्चेत येऊ लागली आहे.
कोरोना काळातील आवश्यकता लक्षात घेता अल्पावधीत फ्रान्समधून २० आणि अमेरिकेहून १२ यांसह ४३ कृत्रिम श्वसन यंत्रे (व्हेटिंलेटर), १४६ प्राणवायू सांद्रित्रचे (कॉन्सट्रेटर) फिरते साहाय्य याशिवाय पहिल्या दळणवळण बंदीमध्ये ४ लाख ५० सहस्र खाद्य पदार्थांची पाकिटे, असे साहाय्य शहरातील सर्व औद्योगिक संघटनांच्या वतीने करण्यात आले होते, तसेच हे केलेले साहाय्य कायमस्वरूपी रहावे यासाठी दीड कोटी रुपयांचा निधी जमवून उभा करण्यात आलेला प्राणवायू प्रकल्प ३ जूनपासून चालू झाला आहे. ७ जून या दिवशी त्याचे उद्घाटन होणार आहे.