अटकेत असलेले प्रा. हनी बाबू यांना घरी नजरकैदेत ठेवण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली !

कोरेगाव भीमा दंगल प्रकरण

हनी बाबू

मुंबई – कोरेगाव भीमा दंगल आणि एल्गार परिषद या प्रकरणांत अटकेत असलेले देहली विद्यापिठाचे प्राध्यापक हनी बाबू यांना त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाने हनी बाबू यांचा वैद्यकीय चाचणी अहवाल नव्याने सादर करण्यास सांगितला आहे. तोपर्यंत त्यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयातच ठेवण्याचा आदेश दिला आहे. ४ जून या दिवशी न्यायमूर्ती एस्.एस्. शिंदे आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपिठापुढे झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने हा आदेश दिला.

हनी बाबू हे तळोजा कारागृहात असतांना त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ‘ब्रीच कॅण्डी’ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती; मात्र सुनावणीच्या वेळी रुग्णालय प्रशासनाकडून ‘हनी बाबू कोरोनामुक्त झाले असून त्यांची प्रकृती सुधारली आहे. त्यांना रुग्णालयात ठेवण्याची आवश्यकता नाही’, असे सांगण्यात आले.

या वेळी हनी बाबू यांच्या अधिवक्त्यांनी ‘हनी बाबू यांना अद्यापही वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्याची आवश्यकता आहे. त्यांना पुन्हा कारागृहात पाठवू नये. त्यांना मुंबईमध्ये भाड्याने घर घेऊन नजरकैदेत ठेवण्याची अनुमती द्यावी’, अशी विनंती न्यायालयाकडे केली होती. यावर न्यायालयाने बाबू यांना १५ जून या दिवशी होणार्‍या पुढील सुनावणीपर्यंत ‘ब्रीच कॅण्डी’ रुग्णालयातच ठेवण्याचा आदेश दिला.