चीनच्या वुहान प्रयोगशाळेतूनच कोरोनाची उत्पत्ती ! – डोनाल्ड ट्रम्प यांचा पुनरूच्चार

चीनने संपूर्ण जगाला ७ लाख ३० सहस्र ३९५ अब्ज रुपये हानी भरपाई देण्याची मागणी  !

वॉशिंग्टन (अमेरिका) – चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेतूनच कोरोनाची उत्पत्ती झाल्याचे मी जे सांगितले होते, तेच सत्य ठरत आहे. आता प्रत्येक जण हेच सांगू लागले आहे. माझे शत्रूही आता तेच सांगत आहेत की, ट्रम्प जे सांगत होते, तेच योग्य होते, असे वक्तव्य अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. या महामारीमुळे झालेल्या हानीसाठी चीनने अमेरिकेसह सर्व जगाला ७ लाख ३० सहस्र ३९५ अब्ज रुपये द्यावेत, अशी मागणीही ट्रम्प यांनी केली.

माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यावर ट्रम्प यांनी टीका करतांना म्हटले की, बराक ओबामा प्रशासनाने मूर्खपणा करून वुहान प्रयोगशाळेला अर्थपुरवठा केला होता. मला जेव्हा याची माहिती मिळाली, तेव्हाच मी निर्णय घेतला की, आता चीनला अर्थसाहाय्य करायचे नाही. याला आताचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांचे आरोग्यविषयक सल्लागार आणि ‘युनायटेड स्टेट्स नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅलर्जी अँड इन्फेक्शियस डिसिजेस’चे संचालक डॉ. अँथनी फाऊची यांनी विरोध केला होता.