निवडणुकांसह अन्य चालू आहे; मात्र वारीला विरोध का ? – वारकर्यांचा प्रश्न
वारकर्यांची परंपरा असलेली आषाढी वारी या वर्षी तरी पायी व्हावी, अशी इच्छा प्रत्येक वारकर्यांच्या मनात आहे. त्यामुळे समस्त वारकरी, महाराज मंडळी, फडकरी यांच्या माध्यमातून ‘नियमांसह पायी वारीसाठी शासनाने अनुमती द्याव’ या मागणीसाठी जोर धरला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर काही वारकरी संप्रदायातील मंडळींच्या प्रतिक्रिया देत आहोत.
या वर्षी वारीला बंदी घातल्यास वारकरी मतदानावर बहिष्कार घालतील ! – ह.भ.प. मारुति शास्त्री तुणतुणे महाराज, महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष, राष्ट्रीय वारकरी परिषद
आषाढी वारी ही अनादी काळापासून चालू आहे. वारीला पुरातन काळापासून वैदिक परंपरा आहे. वारीशी एकनिष्ठ असणार्या वारकर्यांना कोरोनाच्या संसर्गामुळे अडचण निर्माण झाली आहे. सध्या मद्याचीही दुकाने चालू आहेत. इतकेच काय तर ‘ऑनलाईन’ही मद्याची विक्री चालू आहे. वारीला अनुमती द्यावी; कारण दारूची दुकाने चालू आहेत. यावरून सरकार वैदिक धर्माच्या विरोधात आहे, असे समजायचे का ? वारी ही वारकर्यांची ‘साधना’ आहे. सर्व बंद आहे शासनाचे डोके बिघडले आहे का ? वारीसाठीचे नियम पाळण्यास आम्ही सिद्ध आहोत; मात्र वारी सोहळा करण्यासाठी अनुमती द्या. या वर्षी वारीला बंदी घातल्यास येत्या निवडणुकीत वारकरी मतदानावर बहिष्कार घालतील, हे सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे.
भारत देश हा जगाला गुरुस्थानी आहे; मात्र ‘कोरोनापासून वाचण्यासाठी मांसाहार करा’, असे सांगणार्या पुढार्यांना काय झाले आहे कळत नाही. ‘धर्मशास्त्रात जिभेने पाणी पितो तोच मांसाहार करतो’, असे सांगितले आहे. निवडणुकांमुळे कोरोना होत नाही का ? वारी ही दु:खाचे निर्दालन करणारी आहे, त्यामुळे वारीवर बंदी आणून वारकर्यांना दु:खाच्या छायेत लोटू नका.
शासनाने नियम घातले तरी पालखी सोहळा पायीच व्हावा ! – ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्ल्याळीकर, प्रवक्ता, राष्ट्रीय वारकरी परिषद (कर्नाटक)
आतापर्यंत संत तुकाराम महाराजांनी चालू केलेल्या पालखी सोहळ्यापासून आजतागायत पायी वारीमध्ये कधीही खंड पडला नव्हता; मात्र मागील वर्षी कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे वारकर्यांनी शासनाला वेळोवेळी सहकार्य केले. वारकरी सहिष्णु आहेत; म्हणून कोरोना संसर्गाचे नियम केवळ वारकर्यांवरच का लादले जातात ? मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या वेळी मोठ्या प्रमाणात प्रचार सभा घेण्यात आल्या, त्या वेळी कोरोनाचा संसर्ग नव्हता का ? आता कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण न्यून झाले आहे. ‘शासनाने नियम घातले तरी पालखी सोहळा पायीच व्हावा’, अशी आमची मागणी आहे.
पालखी सोहळा होणार, शासनाने सहकार्य करावे ! – ह.भ.प. भगवान महाराज कोकरे, कोकण प्रांत अध्यक्ष, महाराष्ट्र वारकरी महामंडळ
आषाढी वारी ही कोरोनाचा संसर्ग न्यून करण्यासाठी ‘इम्युनिटी पॉवर’ आहे. त्यामुळे आषाढी वारी ही व्हायला हवी. आषाढी वारीसाठी शासनाने कोणतेही निर्बंध घातले तरी कुठल्याही परिस्थितीत पालखी सोहळा होईल, यासाठी शासनाने आम्हाला सहकार्य करावे. आम्ही आमच्या जीवाची काळजी घेऊन, तसेच कोरोनाविषयीच्या नियमांचे पालन करून वारी करणार आहोत. वारीसाठी निर्बंध आणि अन्य गोष्टींना मात्र अनुमती, असा दुजाभाव अयोग्य आहे.
सोहळ्यावर बंदी घालणे वारकरी संप्रदाय कदापि मान्य करणार नाही ! – ह.भ.प. देवव्रत (राणा) महाराज वासकर, मुख्य मानकरी, श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी
मागील वर्षी राष्ट्रीय दळणवळण बंदी असल्याने राज्यशासनास निर्णय घेण्यास अनेक बंधने होती; मात्र या वर्षी आणि मधल्या काळात शासनाने अनेक राजकीय मेळावे, निवडणूक, पदयात्रा यांना अनुमती देण्यात आल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर आम्ही पायी पालखी सोहळ्याची अल्पसंख्येत अनुमती मागत आहोत, आम्ही निर्बंधांसह वारी सोहळ्यात सहभागी होण्यास सिद्ध आहोत; मात्र सोहळ्यावर बंदी घालणे वारकरी संप्रदाय कदापि मान्य करणार नाही. शासनाने वारकर्यांच्या सहिष्णुतेचा आदर ठेऊन समन्वयाचा निर्णय वातावरण चिघळण्यापूर्वी तात्काळ जाहीर करावा.
मुख्यमंत्र्यांनी वारीची परंपरा पुनर्जीवित करत एक नवा इतिहास घडवावा ! – रामकृष्ण हनुमंत महाराज वीर, राष्ट्रीय प्रवक्ता, वारकरी संप्रदाय पाईक संघ
आषाढी वारीला संतांच्या पादुका पायी आणण्याची शेकडो वर्षांपासून परंपरा आहे, तसेच श्री विठ्ठलाची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचीही परंपरा चालू झाली आहे. मागील वर्षी पायी सोहळ्याची परंपरा खंडित झाली; परंतु महापूजेची परंपरा पाळली गेली. या वर्षी तसेच होणार का ? हे महाराष्ट्राच्या वैभवशाली आणि आध्यात्मिक परंपरेस शोभणारे आहे का ? याचा विचार व्हायला हवा. मनोहर जोशी मुख्यमंत्री असतांना ते वारकर्यांसमवेत वाखरी पासून चालत येत असत. यावर्षी अल्पसंख्येत सर्व नियम पाळून पायी सोहळ्यास अनुमती देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ही परंपरा पुनर्जीवित करत एक नवा इतिहास घडवावा.
नियोजन केल्यास पायी वारी सोहळा होणे अशक्य नाही ! – अभयसिंह इचगावकर, उपाध्यक्ष, हिंदु महासभा, महाराष्ट्र प्रदेश
ब्रिटीश काळात वर्ष १९४४ मध्ये आषाढी यात्रा बंदचा निर्णय जनतेने मान्य केला नाही, त्यामुळे यात्रेवरील बंदी उठवावी लागली. त्यामुळे शासनाने यंदा वारकर्यांवर बंदी लादू नये. दोन्ही-तिन्ही सोहळ्यातील मानाच्या दिंड्यांमध्ये १० ते २० वारकर्यांना नियमांसह अनुमती द्यावी; पण काहीही झाले तरी यात्राबंदी करू नये. कुंभमेळा हा ‘सुपरस्प्रेडर’ नव्हता, असे निष्कर्ष आलेले आहेत. नियोजन केल्यास यात्रा आणि पायी वारी सोहळा होणे अशक्य नाही.