भाजप युवा मोर्चाच्या वतीने प्रशासनाला निवेदन
सोलापूर, ३० मे (वार्ता.) – महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेत रुग्णाचे नाव असूनही रुग्णाच्या नातेवाइकांना बाहेरून औषधे आणण्यास सांगतात, तसेच नातेवाइकांनी याविषयी विचारणा केली असता ‘ती औषधे या योजनेत बसत नाही’, असे सांगून रुग्णांची फसवणूक केली जात आहे. तरी यासंदर्भात तातडीने आपण स्वतः लक्ष घालून रुग्णांची हेळसांड थांबवावी, असे पत्र भाजप युवा मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांना देण्यात आले. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वत:हून रुग्णालयांवर अंकुश का ठेवत नाही ? रुग्णांना फसवणार्या अशा रुग्णालयांवर तातडीने कारवाई व्हायला हवी ! – संपादक) या वेळी सागर अतनुरे, संदीप जाधव उपस्थित होते.
भाजप युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्या
१. महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत सर्व रुग्णांना विनामूल्य औषधोपचार द्यावा.
२. अन्य जिल्ह्यांप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचा अर्ज आपल्या कार्यालयाच्या वतीने घ्यावा.
३. योजनेत नाव असूनही रुग्णांकडून पैसे किंवा बाहेरून औषध आणण्यासाठी सांगितले जात असल्यास त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी.
४. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अगोदर ज्यांनी या योजनेत नाव नोंदवूनही त्यांना पैसे भरावे लागले, त्यांना त्यांचे पैसे त्वरित द्यावेत.
५. महात्मा ज्योतिबा फुले योजनेसंदर्भातील अडचणींसाठी ‘हेल्पलाईन’ क्रमांक चालू करावा.