पद्मविभूषण पंडित छन्नूलाल मिश्रा यांच्या मुलीच्या मृत्यूच्या प्रकरणी चौकशी समितीकडून रुग्णालयाला निर्दोष घोषित

चौकशी अर्धवट झाल्याचा पंडित मिश्रा यांचा आरोप

डावीकडून पद्मविभूषण पंडित छन्नूलाल मिश्रा आणि मोठी मुलगी संगीता मिश्रा

वाराणसी (उत्तरप्रदेश) – पद्मविभूषण पंडित छन्नूलाल मिश्रा यांची मोठी मुलगी संगीता मिश्रा यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या मृत्यूच्या प्रकरणी चौकशी करणार्‍या समितीने तिचा अहवाला सरकारला सादर केला आहे. यात संबंधित रुग्णालयाला निर्दोष ठरवण्यात आले आहे. यामुळे पंडित छन्नूलाल मिश्रा यांनी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, ते चौकशी समितीच्या अहवालावर संतुष्ट नाहीत. यात केवळ रुग्णालयाची बाजू मांडण्यात आली आहे. आमची मागणी ‘सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करा’, अशी होती. आम्हाला अद्याप फुटेज दाखवण्यात आलेले नाही.

संगीता मिश्रा यांना कोरोना झाल्याचे चाचणीतून लक्षात आल्यावर येथील मेडविन रुग्णालयात भरती करण्यात आले होते. उपचार चालू असतांना त्यांची प्रकृती चिंताजनक होऊन २९ एप्रिल या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. संगीता मिश्रा यांच्या मृत्यूला त्यांची बहिण नम्रता मिश्रा यांनी रुग्णालयाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे सांगत तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी केली होती. तसेच मृत्यूनंतर संगीता यांचा तोंडवळा दाखवण्यासाठी रुग्णालयाने २५ सहस्र रुपये मागितल्याचा आणि रुग्णालयात जमा केलेल्या पैशांचा हिशोब रुग्णालयाने न दिल्याचा आरोपही नम्रता मिश्रा यांनी केला होता.