आत्महत्या !

स्वतःच स्वतःचे आयुष्य संपवले जाते, त्याला आत्महत्या म्हणतात. जेव्हा एखादी व्यक्ती तिचे जीवन संपवण्यापर्यंतचा निर्णय घेते, तेव्हा तिच्या मनात विचार आणि भावना किंवा निराशा यांचा किती प्रमाणात उद्रेक झाला असेल, याची कल्पनाही करू शकत नाही. कुणी एखाद-दुसर्‍या विचारामुळे किंवा प्रसंगामुळे आत्महत्या करत नाही. अनेक दिवस निराशेचे विचार, वैफल्य, ताणाचे विचार, पराकोटीचे अनेक नकारात्मक विचार यांमुळे जीवन संपवण्याचे विचार व्यक्तीच्या मनात येतात. तीव्र आणि घोर निराशा, हे आत्महत्येमागचे प्रमुख कारण आहे. मनाच्या तात्कालिक अवस्थेवर विजय मिळवल्यासच आत्महत्या रोखली जाऊ शकते.

प्रतिकात्मक छायाचित्र

पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंबपद्धतीत मोठ्यांचे मार्गदर्शनही लाभत असे. सर्वजण सुरक्षित असत. आता विभक्त कुटुंबपद्धतीत असुरक्षितता वाढली आहे. स्वार्थीपणा वाढला आहे. नात्यांमध्ये विश्‍वास वाटत नाही. संबंधांमध्ये कृत्रिमता आली आहे. कुटुंबात मोकळेपणाने बोलण्याचा अभाव आहे. स्वतःकडून किंवा इतरांकडून असलेल्या अपेक्षांचा वारंवार भंग झाला, तर त्यामुळे निराशा येऊन अनेक जण आत्महत्येला प्रवृत्त होतात. शहरासारख्या ठिकाणी स्पर्धेमुळेही निराशा येण्याचे प्रमाण अधिक असते. वलयांकीत व्यक्ती जीवघेण्या स्पर्धेत टिकू शकल्या नाहीत की, आत्महत्या करतात. विद्यार्थ्यांपासून उद्योजकापर्यंत प्रत्येक जण स्पर्धेच्या चढाओढीतच वावरत आहेत. त्यातून आलेले अपयश आत्महत्येचे स्थुलातील कारण ठरते. जैविक, मानसशास्त्रीय आणि सामाजिक कारणेही आत्महत्येची स्थुलातील कारणे म्हणून दिसतात. वरील विविध कारणांमुळे आलेले नैराश्य आणि ताण यांतून सर्वाधिक ७० ते ८० टक्के आत्महत्या होतात. स्किझोफ्रेनिया, बायपोलर डिसॉर्डर आदी मनोविकारांमधूनही आत्महत्या होतात.

‘कोणतीही व्यक्ती अचानक आत्महत्या करते, असे होत नाही. आत्महत्या करणार्‍या बहुतांश व्यक्तींमधील पालट टिपता येऊ शकतो. अशा अनेक व्यक्ती आपण जीव देणार असल्याचे कधी ना कधी बोलून जातात; मात्र त्याकडे सर्वसाधारणपणे दुर्लक्ष केले जाते. अशा व्यक्ती केवळ बोलतात, कृती करत नाहीत, असाही अपसमज आहे. अशा व्यक्तींची चेतावणी गांभीर्याने घेऊन तात्काळ पावले उचलली पाहिजेत. त्यांना बोलते केले पाहिजे, समजून घेतले पाहिजे. त्यांचे समुपदेशन केले आणि आवश्यकतेनुसार उपचारही केले, तर त्यांच्या आत्महत्या रोखता येऊ शकतात’, असे ज्येष्ठ मनोविकारतज्ञ डॉ. संजीव सावजी यांनी सांगितले. तज्ञांच्या मते वेळीच उपचाराला प्रारंभ केल्यास ‘नैराश्य ते आत्महत्या’ हा प्रवास टाळता येऊ शकतो !