भारतातील ५ टॉप भिकार्यांच्या सूचीमध्ये मुंबईतील २ जणांचा समावेश आहे. त्यातील पहिल्या क्रमांकावर परेल येथील भरत जैन यांच्याकडे मुंबईत २ ‘फ्लॅट’ असून त्यांचे मूल्य १ कोटी ४० लाख रुपये आहे. जैन प्रतिमाह भीक मागून ७५ सहस्र रुपये कमावतात. जैन यांचे स्टेशनजवळ ज्यूसचे दुकान असून त्यांनी ते भाड्याने चालवण्यास दिले आहे. तसेच ते इंग्रजीही चांगले बोलतात. तिसर्या क्रमांकावर मुंबईत ‘फ्लॅट’ असणार्या गीता प्रतिमाह ४५ सहस्र रुपये भीक मागून कमावतात. कोट्यधीश असणारे अनेक भिकारी मुंबईत असणे, हे मुंबईचे वैशिष्ट्य म्हणायचे का ? असे असले तरी भीक मागणारे, त्यांना भीक देणारे आणि सरकार या सर्वांसाठी हे शरमेने मान खाली घालायला लावणारेच आहे.
भिकार्यांच्या कमाईचे आकडे ऐकल्यावर सुशिक्षित व्यक्तीही आश्चर्यचकीतच होईल. दादर भागात गेली ४० वर्षे भीक मागणारे प्रतिमाह ३० सहस्र रुपये मिळवतात. त्यांची ५० लाख रुपये किमतीची संपत्ती असून ते घरून रिक्शाने निघतात आणि रस्त्यात कपडे पालटून भीक मागण्याचे कार्य करतात. मुंबईमध्ये असे अनेक भिकारी आहेत की, त्यांचे चांगले व्यवसाय असूनही ते भीक मागतात; कारण ‘कमी कष्टामध्ये भीक मागून कोट्यधीश होता येते’, अशी त्यांची ऐतखाऊ मानसिकता झाली आहे. याचसमवेत सध्या लहान मुलांना भीक मागायला लावणार्यांच्या टोळ्याही मुंबईमध्ये कार्यरत आहेत. मुलांकडून अशी कामे करून घेतल्यानंतर त्यांना पुढे काम करावेसे वाटत नाही. यातूनच ही मुले खिसे कापणे किंवा चोर्या करणे, असे उद्योग करून श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतात.
तरुण आणि धडधाकट व्यक्तीने इतरांनी मिळवलेल्या पैशांवर भीक मागून श्रीमंत होण्याची स्वप्ने पहाणे, ही मानसिकताच देशाला अधोगतीकडे घेऊन जाणारी आहे. हे सर्व पाहिल्यास भिकार्यांना पैसे देणार्यांनीही ‘आपण भिकार्याला पैसे देतो कि श्रीमंताला ?’, याचा विचार करावा. देशाला महासत्ता बनवायचे असेल, तर भीक मागण्यावर बंदीच आणायला हवी. स्वतःच्या कष्टाने मिळवलेल्या पैशांची किंमत ज्याला असते, ती भीक मागून मिळवलेल्याला नसते, हे नक्की ! सरकारने ‘श्रीमंत भिकारी’ निर्माण होत आहेत, याकडे दुर्लक्ष न करता कष्टकरी समाज निर्माण होण्याकडे लक्ष द्यावे, ही अपेक्षा ! हिंदु राष्ट्रात भिकारी नसतील !
– वैद्या (कु.) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल.