लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अधिकोषाशी संबंध नसल्याचा सहकार खात्याचा निर्वाळा !

कर्नाळा नागरी सहकारी बँक आर्थिक घोटाळ्याचे प्रकरण

लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल, १८ मे (वार्ता.) – कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या आर्थिक घोटाळ्याशी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा कोणत्याही प्रकारे संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कर्नाळा अधिकोषाचे चौकशी अधिकारी आणि सहकार खात्याचे उपनिबंधक विशाल जाधव यांनी ठाकूर यांना दोषमुक्त करून त्यांचे नाव चौकशीतून वगळण्याचा निर्णय एका आदेशानुसार घोषित केला आहे. त्यामुळे ठाकूर यांचे नाव कोणत्या ना कोणत्या खोट्या प्रकरणात गुंतवण्याचा खोटेपणा करणार्‍यांना धक्का बसला आहे.

१. कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळ्याची चौकशी सध्या चालू आहे. ५१२ कोटी ५४ लाख ५३ सहस्र २८६ रुपयांचा हा घोटाळा आहे. त्यामुळे अधिकोष आणि अधिकोषाचे खातेदार यांची हानी झाली आहे.

२. अधिकोष स्थापन झाल्यापासून या अधिकोषावर संचालक म्हणून काम केलेल्या ३८ जणांना चौकशीची नोटीस पाठवण्यात आली होती. त्यात रामशेठ ठाकूर यांचेही नाव होते. या नोटिसीला उत्तर देतांना त्यांनी संपूर्ण वस्तूस्थिती उपनिबंधकांसमोर लेखी मांडली.

३. या अधिकोषाची नोंदणी २ मार्च १९९६ या दिवशी झाली होती. रामशेठ ठाकूर हे २ मार्च १९९६ पासून संचालक होते; मात्र कामातून वेळ मिळत नसल्याने त्यांनी स्वत:च संचालक म्हणून काम करण्यास असमर्थतता व्यक्त केली. त्यामुळे त्यांचे नाव संचालक मंडळातून ११ जून १९९७ या दिवशी कमी करण्यात आले. अधिकोषाच्या लेखापरीक्षणातील निरीक्षणांनुसार अधिकोषातील भ्रष्टाचार हा वर्ष २०१३ पासून करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सहकार खात्याच्या उपनिबंधकांनी या आर्थिक घोटाळ्याच्या चौकशीतूनच ठाकूर यांचे नाव पूर्णपणे वगळण्याचा आदेश दिला.