म्युकोरमायकोसीसची ६ प्रकरणे नोंद ! – डॉ. शिवानंद बांदेकर, अधिष्ठाता, गोमेकॉ
गोव्यात म्युकोरमायकोसीसची ६ प्रकरणे नोंद झाली आहेत. उच्च मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये अशी प्रकरणे आढळतात, अशी माहिती गोमेकॉचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली. अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर पुढे म्हणाले, ‘‘गोमेकॉत आता ऑक्सिजनचा तुटवडा नाही.’’ आरोग्य खात्याचे सचिव रवि धवन म्हणाले, ‘‘रात्री २ ते सकाळी ६ या वेळेत गोमेकॉत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्ण दगावतात ही गोष्ट चुकीची आहे.’’
ग्रामीण भागात नेट जोडणीचा अभाव असल्याने कोरोना लसीकरणासाठी ‘ऑनलाईन’ नोंदणीची पद्धत ठेवणे चुकीचे ! – सुदिन ढवळीकर, आमदार, मगोप
गोव्यातील ग्रामीण भागात नेट जोडणीचा अभाव आहे. अशा परिस्थितीत गावातील अशिक्षित युवा आणि युवती यांनी कोरोना लसीकरणाविषयी ‘ऑनलाईन’ नोंदणी कशी करायची ? माझ्या ऐकिवात असे आले आहे की, काही जण कोरोना लसीविषयी ‘ऑनलाईन’ नोंदणीसाठी संबंधितांकडून ३०० ते ३५० रुपये उकळत आहेत. कोरोना महामारीमध्ये कशाला प्राधान्य द्यावे ? हे शासनाला अजूनही समजलेले नाही. गोवा शासनाने नेट जोडणीचा विषय प्रधान्याने सोडवला पाहिजे, अशी मागणी मगोपचे नेते तथा आमदार श्री. सुदिन ढवळीकर यांनी केली आहे.
सर्व खासगी रुग्णालयांतील रुग्णभरतीचे व्यवस्थापन शासनाधीन
गोवा शासनाने आपत्कालीन व्यवस्थापनाला अनुसरून कोरोनाबाधित रुग्णांना उपचार देण्यासाठी खासगी रुग्णालयांचे व्यवस्थापन स्वत:कडे घेतले आहे. राज्यशासनाने या अनुषंगाने आदेश काढला आहे. पुढील एक मासासाठी हा आदेश लागू रहाणार आहे. एका मासानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.
अंगणवाडी सेविका ‘इव्हरमेक्टिन’च्या गोळ्या घरोघरी वितरित करणार
अंगणवाडी सेविका पुढील २ दिवसांत ‘इव्हरमेक्टिन’च्या गोळ्या घरोघरी वितरित करणार आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हणाले, ‘‘महिला आणि बालकल्याण खाते आणि अंगणवाडी सेविका यांच्या साहाय्याने आरोग्य खाते पुढील २ दिवसांत ‘इव्हरमेक्टिन’च्या गोळ्या घरोघरी वितरित करणार आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूचा दर उणावण्यासाठी राज्यशासनाने नवीन नियमावली सिद्ध केली आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासन ‘इव्हरमेक्टिन’च्या गोळ्या वितरित करणार आहे.’’