हिंगोली येथे ३८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ‘शुभकल्याण मल्टीस्टेट क्रेडीट पतसंस्थे’च्या संचालकांना अटक

हिंगोली – हिंगोलीसह राज्यातील ११ जिल्ह्यांत ‘शुभकल्याण मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट पतसंस्थे’च्या माध्यमातून ठेवीदारांची ३८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बापूराव सोनकांबळे या संचालकांना येथील पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने हारबळ (जिल्हा नांदेड) येथून १३ मे या दिवशी अटक केली.

धाराशिव जिल्ह्यातील हावरगाव येथील ‘शुभकल्याण मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट पतसंस्थे’च्या माध्यमातून ११ संचालकांनी ठेवीदारांना अधिक व्याजाचे आमिष दाखवले. त्यानुसार राज्यात ११ जिल्ह्यांतून अनुमाने ३८ कोटी रुपयांच्या ठेवी जमा केल्या; मात्र ठेवीवर व्याज दिलेच नाही. त्यामुळे फसवणूक झालेल्या ठेवीदारांनी या पतसंस्थेच्या संचालकांच्या विरोधात तक्रारी केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात आले होते. वर्ष २०१७ मध्ये ११ जिल्ह्यांत ३३ ठिकाणी गुन्हे नोंद झाले आहेत.