‘द वीक’ला ‘कीक’ !

क्रांतीकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक लेख प्रसिद्ध केल्याप्रकरणी ‘द वीक’ या इंग्रजी साप्ताहिकाने नुकतीच जाहीर लेखी क्षमायाचना केली आहे. ‘द वीक’च्या २४ जानेवारी २०१६ च्या साप्ताहिकामध्ये ‘लॅम्ब लायनाइस्ड’ या मथळ्याखाली हा लेख प्रसिद्ध केला होता. या प्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर यांनी ‘द वीक’च्या विरोधात दादर येथील भोईवाडा मुख्य महानगर दंडाधिकार्‍यांकडे फौजदारी खटला प्रविष्ट केला. निरंजन टकले यांनी हा लेख लिहिला आहे. आता प्रकाशन संस्थेने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याविषयी आमच्या प्रकाशनाला चुकीचे मार्गदर्शन करून आणि अंधारात ठेवून हा लेख लेखकाने लिहिला आहे. आमचा त्याच्याशी काही संबंध नाही’, असे सांगत क्षमा मागितली.

उपेक्षित क्रांतीकारक !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अवमानाविषयी त्यांचे नातू श्री. रणजित सावरकर यांनी अनेक वर्षे चिकाटीने लढा दिल्याविषयी त्यांचे कौतुकच केले पाहिजे. भारतीय इतिहासात सर्वांत अधिक हालअपेष्टा सहन करून मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणार्‍या क्रांतीकारकांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव अग्रस्थानी आहे. तसेच देशासाठी सर्वस्वाचा होम करूनही सर्वांत अधिक टीकाटीपण्या, अवमान ज्यांच्या वाट्याला स्वातंत्र्यानंतर आला, तेही स्वातंत्र्यवीर सावरकरच ! स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे कुटुंबीय यांनी देशासाठी केलेला त्याग अतुलनीयच आहे; मात्र त्याचा उचित असा सन्मान तर दूरच राहिला, त्यांना ‘खलनायक’ ठरवण्याचा प्रयत्न सर्वच स्तरांतील सावरकरद्वेषींकडून झाला. त्यामुळे सावरकर यांच्या वाट्याला अवहेलनाच आली. इंग्रजांनी काळ्यापाण्याची शिक्षा दिली, त्यांची ‘बॅरिस्टर’ही पदवी काढून घेण्यात आली. विदेशी कपड्यांची होळी केल्यामुळे महाविद्यालयाच्या वसतीगृहातून त्यांचे नाव काढण्यात आले. मानहानी आणि हालअपेष्टा यांचे अनंत प्रसंग झेलूनही स्वातंत्र्यविरांना कुणी वाकवू शकला नाही, ते पाप त्यांच्या नंतर स्वतंत्र भारतातील काही कर्मदरिद्री लोकांनी करण्याचा प्रयत्न केला. सर्वांत अधिक स्वातंत्र्यविरांचा अवमान कुणी केला असेल, तर तो काँग्रेससारख्या मुसलमानधार्जिण्या पक्षाने. स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान नेहरू यांच्या सरकारने सावरकरांवर पाळत ठेवली होती. धर्मांध त्यांना पाण्यात पहात होते; कारण त्यांनी हिंदूसंघटनाचा मोठा प्रयत्न केला होता. काँग्रेसच्या मणिशंकर अय्यर यांनी तर अंदमानाच्या कारागृहातील सावरकरांची वाक्येच काढून टाकली. जे.एन्.यू.मध्ये त्यांच्या पुतळ्याला काळे फासून चपलांचा हार घालण्यात आला.

‘भारतरत्ना’चा सन्मान वाढवू शकणारे व्यक्तीमत्त्व !

‘भारतरत्न’चा बहुमान मिळण्यास सर्वाथाने पात्र व्यक्ती असूनही अद्याप लालफितीच्या कारभारामुळे म्हणा किंवा राजकीय इच्छाशक्तीचा अभाव म्हणा, सावरकर यांना ‘भारतरत्न’ दिला जात नाही, हे भारतियांचे दुर्दैव नव्हे तर काय ? स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा धसका घेतला तो साम्यवाद्यांनी ! त्यांच्याविषयी सतत काही ना काही अपसमज पसरवणे, त्यांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडून भारताच्या फाळणीची बिजे रोवली सांगणे, ‘माफीवीर’ म्हणून निर्भत्सना करणे हे उद्योग साम्यवाद्यांनी केले. खरे पाहिले तर त्यांच्या कोणत्याच आरोपांना कोणताही आधार नाही; मात्र रेटून खोटे बोलण्याच्या पद्धतीमुळे अगदी आताच्या पिढीला हे सर्व आरोप खरे वाटू लागतात आणि त्यांचा सावरकरांकडे पहाण्याचा दृष्टीकोनच पालटतो. त्यामुळे त्यांच्या पुतळ्याला काळे फासण्याचे प्रकार काही विद्यार्थ्यांकडून होतात. एन्.सी.ई.आर्.टी.च्या पाठ्यपुस्तकांमध्ये ज्याप्रमाणे भारतीय राजांचा इतिहास न घेता मोगलांचा इतिहास आहे, तोच कित्ता स्वातंत्र्यविरांसारख्या तेजस्वी क्रांतीसूर्याविषयी आहे. त्यांनी केलेल्या अतुलनीय कार्याचा उल्लेख केला जात नाही. ही पार्श्‍वभूमी लक्षात घेता श्री. रणजित सावरकर यांनी दिलेल्या न्यायालयीन लढ्याचे महत्त्व लक्षात येते. भारतातील हिंदूंच्या मनातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीच्या स्मृती पुसून टाकल्यास, हिंदूंचा बुद्धीभेद करणे सोपे जाईल, हे हिंदुद्वेष्टे आणि भारतद्वेष्टे यांना ठाऊक आहे. त्यामुळे या स्मृती पुसण्याचा आटापिटा कित्येक दशके चालू आहे; मात्र हे तितके सोपे नाही, हे या हिंदुद्वेष्ट्यांना नक्कीच उमगले असेल !

स्वातंत्र्यवीर सूर्याप्रमाणे तळपतील !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कारागृहात आणि कारागृहाबाहेरही हिंदूसंघटनाचे मोठे कार्य केले. त्यांनी हिंदु धर्माचा अभ्यास केला होता. तरी त्यांना गोहत्येचे समर्थन करणारे, नास्तिक असे सांगून हिंदु धर्माविरुद्ध त्यांचा वापर केला जातो. ‘एबीपी माझा’ या वाहिनीने एका कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केला. ‘सावरकर नायक कि खलनायक ?’ या शीर्षकाचा त्यांचा कार्यक्रम झाल्यावर लोकांनी अतिशय कडाडून विरोध केल्यावर वाहिनीने थातूरमातूर शब्दांत क्षमा मागितली. बहुतांश इंग्रजी भाषिक वर्तमानपत्रांमध्ये साम्यवादी, पुरोगामी आणि निधर्मीवादी हे सावरकरांविषयी अवमानकारक लिखाण करतात. त्यांचा प्रतिवाद करण्याचा काही जण प्रयत्न करतात; मात्र या वृत्तपत्रांच्या मागे आर्थिक, राजकीय आणि कायदेशीर असा मोठा आधार असल्याने त्यांना त्यांचे कुणीच काही वाकडे करू शकत नाही, असे वाटत असते. त्यामुळे लोकही त्यांच्या नादाला लागत नाहीत. परिणामी त्यांचे फावते आणि अगदी वाटेल ते लिखाण बिनबोभाटपणे करून त्यांची पाने (रद्दी) भरत असतात. इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये हिंदूंच्या देवता आणि श्रद्धास्थाने यांचे विडंबन अधिक प्रमाणात केलेले असते. आंध्रप्रदेशातील प्रसिद्ध ‘डेक्कन क्रॉनीकल’ने श्री दुर्गादेवीचे विडंबन केल्यावर हिंदु जनजागृती समितीने आवाज उठवला. तेव्हा या दैनिकाने त्वरित क्षमायाचना केली. श्री. रणजित सावरकर यांनी दिलेल्या लढ्यामुळे आणि त्याला आलेल्या यशामुळे इतरांना वैचारिक लढा देण्यासाठी प्रेरणा आणि हुरूप मिळेल. न्यायालयीन मार्गावरील लोकांचा विश्‍वास दृढ होईल. स्वातंत्र्यवीर सावरकर हे व्यक्तीमत्त्व समजणे येरागबाळ्याचे काम नाही. ते काळाच्या ओघात बावनकशी सोनेच आहे, हे सिद्ध होणार आहे. मधल्या कालखंडात कृतीशील हिंदूंच्या संघटनामुळे आणि वैचारिक लढ्यामुळे सावरकरद्वेष, हिंदुद्वेष, भारतद्वेष यांना चांगलाच चाप बसणार आहे, हे निश्‍चित !