ईश्‍वराला प्रार्थना आणि अग्निहोत्र करण्यासह विविध उपाय करून नियमित साधना करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती

‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या ऑनलाईन परिसंवादांतर्गत ‘कोरोना महामारीच्या काळात मनाला स्थिर कसे करायचे ? – भाग २’ या विषयावर विशेष चर्चासत्र !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच ‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या ऑनलाईन परिसंवादांतर्गत ‘कोरोना महामारीच्या काळात मनाला स्थिर कसे करायचे ? – भाग २’ या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्रात सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव, हरियाणा येथील वैद्यकीय तज्ञ डॉ. भूपेश शर्मा आणि हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश अन् राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया सहभागी झाले होते. या चर्चासत्राचा लाभ ट्विटर, यू ट्यूब आणि हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून ८ सहस्र ९८० जिज्ञासूंनी घेतला. या चर्चासत्रामध्ये वक्त्यांनी कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये नागरिकांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर कोणती काळजी घ्यावी ? याविषयीची अत्यंत महत्त्वपूर्ण सूत्रे सांगितली. यामुळे ‘हा कार्यक्रम पुष्कळ आवडला’, असे अनेकांनी उत्स्फूर्तपणे सांगितले.

सद्गुरु नंदकुमार जाधव

पुणे – कोरोनाच्या महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अनेकांच्या मनात भय, नकारात्मता, निराशा वाढली आहे, तसेच काहींच्या मानसिक संतुलनावरही विपरित परिणाम झाला आहे. अशा स्थितीत नियमित साधना केल्याने मानसिक तणाव, भीती न्यून होऊन मन चिंतामुक्त होते आणि आनंदी राहू शकते. प्रार्थनेमध्ये अनन्यसाधारण बळ असल्याने ईश्‍वराला प्रार्थना करणे महत्त्वाचे आहे. प्रार्थना केल्याने मन स्थिर आणि सकारात्मक होण्यास साहाय्य होते. भक्ताने ईश्‍वराला प्रार्थना केल्यावर ईश्‍वर भक्तांना साहाय्य करतोच; मात्र ही प्रार्थना मनापासून करायला हवी. प्रार्थनेमुळे रोगाचे निवारण होते, हे विविध प्रयोग करून स्पष्ट झाले असून त्याविषयीचा संशोधनात्मक अहवालही प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे विविध प्रार्थनांच्या माध्यमातून आपण मन स्थिर आणि सकारात्मक ठेवू शकतो. प्रार्थनेसमवेत हवा शुद्ध करण्यासाठी अग्निहोत्र परिणामकारक आहे. सूर्योदय आणि सूर्यास्त झाल्यानंतर लगेचच अग्निहोत्राचा विधी करावा. कोणत्याही अणू उत्सर्जनाचा प्रभाव नष्ट करण्यासाठी अग्निहोत्र ही उपयुक्त पद्धती असल्याने या वेळी अग्निहोत्र करायला सांगितले आहे. अग्निहोत्रामुळे ९० टक्के जंतूंची वाढ रोखली जाते. हवेतील सल्फर डायऑक्साईडचे प्रमाण न्यून होते. यामुळे वातावरण शुद्ध होऊन हवेत निर्माण होणार्‍या जंतूंची निर्मिती रोखू शकत असल्याने आपण स्वतःचे रक्षण करू शकतो. सध्याच्या आपत्काळात अशा विविध उपायांचा अवलंब करून नियमित साधना करा, असे आवाहन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले.

मानसिक संतुलन राखण्यासाठी प्रयत्न करा !

सद्गुरु नंदकुमार जाधव पुढे म्हणाले की, सध्या दूरदर्शनवरील बातम्यांमुळे मनुष्याचे मानसिक संतुलन बिघडून नकारात्मक स्थिती निर्माण होत आहे. भय, चिंता, तणाव, नकारात्मकता, मानसिक संतुलन बिघडणे यांवर मात करण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने नियमित चालू असलेल्या ‘ऑनलाईन’ सत्संगाला जोडणे, सनातनने प्रकाशित केलेल्या किंवा अन्य धार्मिक ग्रंथांचे वाचन करणे, संतांच्या अध्यात्मशास्त्रावरील ध्वनीचकत्या ऐकणे, तसेच नामजप करणे यांसारख्या विविध कृती करून मनाची सकारात्मकता आणि ईश्‍वरावरील श्रद्धा वाढण्यास साहाय्य होईल. सनातनच्या वतीने चालू असलेल्या ‘ऑनलाईन’ सत्संगामुळे तणाव, भय दूर होऊन मन स्थिर आणि आनंदी अन् सकारात्मक रहायला साहाय्य झाल्याची अनुभूती अनेक जण घेत आहेत.

नियमित व्यायाम, योगासने आणि प्राणायाम केल्यास रोगप्रतिकारक क्षमता वाढते ! – डॉ. भूपेश शर्मा, वैद्यकीय तज्ञ, हरियाणा

डॉ. भूपेश शर्मा

कोरोनाच्या महामारीत आपल्या आरोग्यासाठी आयुर्वेदातील सूत्रांचा दिनचर्येत योग्य प्रकारे अवलंब केल्यास शारीरिक आणि मानसिक बळ मिळते. नियमित व्यायाम, योगासने, प्राणायाम आणि पचनशक्ती वाढवण्यासाठी उपाय केल्याने फुप्फुसांची कार्यक्षमता अन् मनुष्याची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास साहाय्य होते. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत फुप्फुसांवर आक्रमण होत आहे. प्राणघातक परिस्थिती पालटण्यासाठी खाण्यामधून जाणारी विषारी तत्त्वे रोखली पाहिजेत. अंघोळीच्या अगोदर सर्वांगाला तेल (अभ्यंग करावे) लावावे. यामुळे फुप्फुसांमधील रुक्षता न्यून होण्यास साहाय्य होते. तसेच जेवणामधील मेदाचे (फॅटचे) प्रमाण न्यून केले पाहिजे; कारण त्यामुळे शरीरात रुक्षता निर्माण होते. शिळे अन्न खाऊ नये. नियमित शुद्ध तूप आणि तेल यांचा जेवणात समावेश करावा. यामुळे वायूतत्त्व संतुलनात राहून शरीरातील ऑक्सिजनची पातळी संतुलित रहाते.

डॉ. भूपेश शर्मा यांनी सांगितलेली सूत्रे

१. अधिक वेळ उपाशी राहिल्याने ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. रात्रीचे जागरण करणे आणि पुष्कळ वेळ उपाशीपोटी राहिल्याने शरिरामधील वायूचे प्रमाण वाढून फुप्फुसांवर दुष्परिणाम होतो.

२. लहान मुलांना कोरोना संसर्गापासून वाचवण्यासाठी केळी आणि दही जास्त प्रमाणात देऊ नये. द्यायचे असल्यास त्याच्यासमवेत मधाचाही वापर करावा. लहान मुलांना पचण्यास जड अन्न देऊ नये.

३. नियमित आले आणि तुळशीचा रस काढून त्याचे काही थेंब अर्धा चमचा मधातून दिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढून फुप्फुसाची क्षमता वाढते. तुळस, अडुळसा, गुळवेल, जिरे आणि गूळ वापरून काढा घ्यावा. यामुळे शक्ती वाढवण्यास साहाय्य होते.

प्रत्येकाने दायित्वाचे भान ठेवून कोरोनाच्या महामारीविरुद्ध लढा द्यायला हवा ! – आनंद जाखोटिया, मध्यप्रदेश अन् राजस्थान समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

श्री. आनंद जाखोटिया

कोरोना महामारीच्या काळात स्वत:च्या दायित्वाचा विचार करायला हवा. शासनाने कोरोनाच्या संदर्भात सांगितलेल्या सर्व नियमांचे पालन करायला हवे. आपला व्यवसाय करतांना जनतेला न्यूनतम मूल्यात वस्तू आणि सेवा उपलब्ध करून द्यायला हव्यात. तसेच समाजात आढळणारा भ्रष्टाचार, काळाबाजार यांविरुद्ध सामाजिक माध्यमांद्वारे जागृती करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. त्यामुळे किमान समाजात ‘छी-थू’ होण्याच्या भयाने तरी असे अपप्रकार रोखले जातील. केवळ ‘स्व’चा विचार न करता स्वयंस्फूर्तीने समाजाच्या रक्षणासाठी वेळ द्यायला हवा.

सध्या सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली धर्म शिकवला जात नाही. त्यामुळे चुकीच्या गोष्टी केल्याने लागणार्‍या पापाची लोकांना भीती वाटेनाशी झाली आहे. ही परिस्थिती पालटण्यासाठी प्रशासन आणि जनता यांनी एकमेकांशी समन्वय, सुसंवाद साधत, तसेच दायित्वाने वागून सर्वांनी या विरोधात लढायला हवे.

‘युद्धाच्या आधी सिद्धता केल्यास जास्त रक्तपात होत नाही’, अशी एक म्हण आहे. सध्या समाज कोरोनासारख्या युद्धस्थितीतून जात आहे. कोरोनाने आपल्याला शारीरिक, मानसिक आणि आत्मबळ वाढवणे किती आवश्यक आहे ? हे दाखवून दिले. त्यामुळे आता स्वत:ची क्षमता वाढवण्यासाठी ‘दळणवळण बंदी’ ही एक सुवर्णसंधी आहे. या वेळेचा सर्वांनीच सदुपयोग करायला हवा. सद्यःस्थितीत शारीरिक क्षमता, मनोबल आणि आत्मबळ वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. नियमित योग, प्राणायाम आणि व्यायाम आदी गोष्टी करायला हव्यात.

जिज्ञासूंचे विशेष अभिप्राय

ज्योती चिंचलकर – अनेक ठिकाणी शारीरिकदृष्ट्या उपाय मिळू शकतात; परंतु या चर्चासत्रामध्ये शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा तीनही स्तरांवर उपाय सांगितले.

श्री. विश्‍वास पाटील – सर्व हिंदूंना योग्य मार्गदर्शन मिळण्याचे हे एकमेव व्यासपीठ आहे.

श्री. किरण कुर्डेकर – मंदिरांमध्ये पूर्वी ज्याप्रमाणे होम-हवन होत होते, त्याप्रमाणे आताही झाल्यास मृत्यू झालेल्यांची शुद्धी होईल.

स्मिता महामुनी – अग्निहोत्रामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते आणि कोरोना होणार नाही, याची मनाला निश्‍चिती मिळते. देवाच्या चरणी याविषयी खूप खूप कृतज्ञता !

पूनम सलेकर – पुष्कळ छान आणि उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद आणि कृतज्ञता. जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी उपास्यदेवतेला करण्यास सांगितलेल्या विविध प्रार्थना !

  • कोरोना संसर्गाची भीती वाटत असल्यास – ‘हे ईश्‍वरा, मला संसर्गाची वाटणारी भीती दूर होऊन माझे मनोबल आणि सकारात्मकता वाढू दे.’
  • नातेवाइकांना किंवा स्वतःला कोरोनाचा संसर्ग झाल्यास – ‘हे ईश्‍वरा, आपल्याच कृपेने आम्ही बरे होणार आहोत. माझी श्रद्धा अखंड राहून ती वृद्धिंगत होऊ दे आणि माझा सतत नामजप चालू राहू दे.’
  • महामारीच्या काळात आर्थिक हानी झाल्याने पालन-पोषणाची काळजी वाटत असल्यास – ‘हे ईश्‍वरा, सगळे आपल्याच कृपेने होत आहे. आपणच पालन-पोषण करणार आहात, ही श्रद्धा दृढ होऊ दे आणि आपली कृपादृष्टी आमच्या परिवारावर सतत राहू दे.’
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक