Vikramaditya Vedic App : गृहमंत्री अमित शहा उज्जैनमध्ये करणार ‘विक्रमादित्य वैदिक ॲप’चे लोकार्पण !

उज्जैन (मध्यप्रदेश) – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उज्जैनमध्ये ‘विक्रमादित्य वैदिक ॲप’चे लोकार्पण होणार आहे. या ॲपद्वारे १८९ भाषांमध्ये ग्रह, नक्षत्र आणि शुभ वेळ जाणून घेता येणार आहे. याखेरीज या ॲपमध्ये सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या वेळेच्या गणनेसह पंचांगातील इतर तपशीलांची माहितीदेखील असेल. उज्जैनमध्ये यापूर्वी वैदिक घड्याळााचे लोकार्पण करण्यात आले होते. हे ॲप पूर्णपणे विनामूल्य असणार आहे.

विक्रमादित्य संशोधन केंद्राचे संचालक श्रीराम तिवारी म्हणाले की, सध्या या ॲपची ‘गूगल प्ले स्टोअर’वर चालू करण्याच्या संदर्भात चाचणी चालू आहे. ते लवकरच पूर्ण होईल आणि एप्रिलमध्ये त्याचे लोकार्पण केले जाईल.

पंतप्रधानांनी केले होते विक्रमादित्य वैदिक घड्याळाचे लोकार्पण !

२९ फेब्रुवारी २०२४ या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्जैन येथे विक्रमादित्य वैदिक घड्याळाचे लोकार्पण केले होते. हे भारतीय वेळेच्या गणनेवर आधारित जगातील पहिले घड्याळ आहे, जे वैदिक वेळेच्या गणनेतील सर्व घटक एकत्र करून बनवले गेले आहे. या घड्याळात विक्रम संवत, योग, भाद्र, सण, शुभ आणि अशुभ काळ, घटी, नक्षत्र, जयंती, व्रत, उत्सव, चौघडिया, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, ग्रह, नक्षत्रांची गणना आदी समाविष्ट आहे.