कुडाळ – आपल्या वैदिक, धार्मिक संदर्भग्रंथांमध्ये ‘धूपन’ विधीचा पुरस्कार करणारे अनेक दाखले आहेत. पुराणातील या दाखल्यांकडे दुर्लक्ष करण्यात धन्यता मानून आपण त्याचे वैज्ञानिक महत्त्व सोडून देतो. कोरोनामुळे निर्माण झालेल्या सध्याच्या परिस्थितीत आता धूपनाचे महत्त्व जाणून घेण्याची आत्यंतिक आवश्यकता निर्माण झाली आहे. याची जाणीव सर्वांना व्हावी, यासाठी १४ ते १८ मे या कालावधीत ‘सर्वांनी हवन, धूपन करूया’, असे आवाहन कुडाळ येथील प्रतिथयश वैद्य सुविनय दामले यांनी केले आहे.
याविषयी वैद्य दामले यांनी सांगितले की, सकारात्मक मनोभूमिकेतून, केवळ एक विज्ञाननिष्ठ कृती म्हणून आपण ही हवन, धूपन प्रक्रिया चालू करायची आहे. १४ मे या अक्षय्य तृतीयेच्या दिवसापासून १८ मेपर्यंत सलग ५ दिवस प्रतिदिन सकाळी १० वाजता आणि सायंकाळी ६ वाजता ‘हवन’, ‘धूपन’ करायचे आहे.
छद्मचर, सूक्ष्म शत्रूशी लढायचे, तर सूक्ष्मातूनच प्रतिकार करायला हवा. हवा, वायू स्वरूपाइतके सूक्ष्म दुसरे काही नाही. ‘मॉस्किटो मॅटचे व्हेपर’ कानाकोपर्यापर्यंत पोचतात, हे जर आपण गृहित धरतो, तर हे औषधी धूपनही सूक्ष्मातीसूक्ष्म पातळीपर्यंत पोचणारच, हे मान्य करावेच लागेल. आता प्रत्यक्ष अनुभव घेण्याची वेळ आली आहे. वैयक्तिक, तसेच सामूहिक रित्या सर्वत्र एकाच वेळी हे हवन कर्म करायचे आहे. सामूहिक प्रार्थनेचे महत्त्व आपल्याला ज्ञात आहेच. सामूहिकपणे, सर्व धर्मियांनी एकत्र येत, हे औषधी हवन करूया आणि संकल्प करूया की, हा कोरोनारूपी सूक्ष्म राक्षस या औषधी धूपनाने नष्ट होऊ दे ! या धूपनाविषयीची अधिक माहिती https://youtu.be/LE2QtEv9BnI या यू-ट्यूब लिंकवर उपलब्ध आहे, असे वैद्य दामले यांनी सांगितले.