छद्म अंनिसच्या अंधश्रद्धा !

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ११ ते १४ मे या काळात छद्म विज्ञानावर आधारित ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित केली आहे. ऋषिमुनींनी जे शोध लावले आहेत, त्याला अंनिस आणि काही तथाकथित वैज्ञानिक ‘छद्म’ म्हणून संबोधतात ! छद्म या शब्दाचे अर्थ खोटे; ढोंगी; फसवे; कृत्रिम; धोकादायक; गुप्त ठेवण्याची किंवा काही लपवण्याची क्रिया किंवा भाव; रूप, रंग आकार-प्रकार याने वरवर एकसारखे वाटणारे दिखाऊ, पण आतून वेगळे अशा प्रकारचे आहेत. खरे तर ‘जे विज्ञानाच्या नियमांचे पालन करत नाहीत’ त्याला इंग्रजीत ‘सुडो सायन्स’ असा शब्द आहे आणि त्याचे भाषांतर म्हणून ‘छद्म’ हा शब्द वापरला जात आहे. अस्पष्टता, असंगती, अतीरंजितता, अप्रमाणित प्रयोग; दाव्याचे खंडण करण्याच्या कठोर प्रयत्नांऐवजी स्पष्टीकरण देणे आणि पूर्वग्रह, तज्ञांच्या परीक्षणांचा विरोध, सिद्धांत विकसित करायला लागणार्‍या कार्यपद्धतींचा अभाव आदी गोष्टींचा अंतर्भाव ‘सुडो सायन्स’ या संकल्पनेत केला जातो. थोडक्यात, ‘प्राचीन भारतीय शोध हे या प्रकारचे आहेत’, असे अंनिस आणि तथाकथित बुद्धीवादी शास्त्रज्ञ यांना म्हणायचे आहे. एवढे सविस्तर अर्थ देण्यामागचे कारण म्हणजे सनातन हिंदु संस्कृतीत ऋषिमुनींनी लावलेले शोध हे अशा प्रकारचे आहेत, हे बुद्धीवादी शास्त्रज्ञांच्या साहाय्याने काही उदाहरणे देऊन पटवण्याचा अंनिससारख्या संस्था प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अन्य जे प्राचीन भारतियांचे शोध म्हणून सांगतात, याविषयी ‘एका ठराविक टप्प्यापर्यंत सांगितले आहे. त्याला मर्यादा आहेत, ते म्हणजे सर्व परिपूर्ण नव्हे, ते सिद्ध करता येत नाही, असे होऊ शकत नाही किंवा आता होत नाही, हे शक्यच नाही, विज्ञानाच्या गुणधर्मात ते बसत नाही, त्याचे परिणाम दिसत नाहीत, अशी उदाहरणे आढळत नाहीत’ आदी अनेक कारणे आणि स्पष्टीकरणे या बुद्धीवाद्यांकडून दिली जातात. वरून त्यांचे हेही म्हणणे असते की, सामान्य जनता यामुळे फसवली जात आहे, त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत; म्हणून आम्ही याविषयी जागृती करत आहोत. छद्म विज्ञान म्हणून प्राचीन भारतीय संशोधनाला अतिशय तुच्छ लेखणारे आणि पूर्णतः अडगळीत टाकण्यालायक रम्य कपोलकल्पित कहाणी समजणारे हे संशोधक किंवा शास्त्रज्ञ आहेत. शास्त्रज्ञ किंवा संशोधक हे सध्याच्या आधुनिक विज्ञानाच्या क्षेत्रातील अभ्यासक असतात. त्यांनी अध्यात्म किंवा धर्म यांचा अभ्यास केलेला नसतो. त्यामुळे त्यातील नियम, त्या नियमांचे लाभ, त्यांचा सृष्टी, मानवी जीवन यांच्याशी असलेला घनिष्ट संबंध आदींविषयीचा त्यांचा अभ्यास नसतो.

खरेतर भारतीय शास्त्रे ही अनुभूतीजन्य अभ्यासाने दृगोच्चर होतात. ऋषिमुनींचा मूलभूत पाया हा अध्यात्म असल्याने त्यांचे संशोधन किंवा संशोधनाचे ग्रंथ समजून घेण्यासाठी अध्यात्म आणि धर्म यांच्या मूलभूत नियमांची ओळख असणे अत्यंत आवश्यक आहे. आधुनिक संशोधकांचा अध्यात्म किंवा धर्म यांचा अभ्यास नसतो. त्यामुळे प्राचीन भारतीय शोधांना तुच्छ लेखणार्‍या किंवा ते न मानणार्‍या शास्त्रज्ञांची त्याकडे पहाण्याची दिशाच चुकल्याने ते शोध त्यांना शास्त्रीयदृष्ट्या अयोग्य वाटतात किंवा ‘सध्याच्या विज्ञानाच्या नियमांत ते बसत नाहीत’, असे त्यांना वाटते. अंनिससारखे धर्मद्वेष्टे अशा संशोधकांना हाताशी घेऊन मग सनातन ग्रंथ कसे खोटे, संकुचित, कालबाह्य आणि तुच्छ आहेत, हे सांगत सुटतात. डॉ. सत्यजीत रथ यांच्यासारखे या व्याख्यानमालेत सहभागी झालेले एक संशोधक गीतेत वर्णसंकर, श्राद्धविधी आदींसंदर्भात अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलेल्या प्रश्नावर यथेच्छ टीका करतात. प्रश्न विचारण्याला आणि त्याच्या प्रश्नांना तुच्छ लेखणे हिंदुद्वेषाच्या पूर्वग्रहातून आल्याविना होत नाही. विज्ञानात प्रश्न विचारण्याचा आणि ज्ञान घेण्याचा अधिकार नाही का ? नसेल तर ‘विज्ञानाची एकाधिकारशाही भारतियांनी का जुमानावी ?’, असा उलटा प्रश्न आम्ही विचारतो. महाभारतात आलेले प्रचंड विज्ञान – पदार्थविज्ञान, धातूविज्ञान, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र, आरोग्यशास्त्र, जीवशास्त्र, शस्त्रविज्ञान आदी डॉ. रथ यांना दिसले नाही. डॉ. रथ यांनी भारतीय धर्मग्रंथांकडे खरोखरच जिज्ञासू संशोधकाच्या वृत्तीने पाहिले असते, तर सर्वप्रथम गीतेतील विज्ञान पाहून ते थक्क झाले असते.

हिंदुद्वेष सोडा !

कुठल्याही शास्त्राचे काही मूलभूत नियम असतात. त्यावर त्याचा पूर्ण पाया रचला गेलेला असतो. प्राचीन ऋषींचे संशोधन ज्या पायावर आहे, तो पाया अतिशय सर्वव्यापी आहे; तुलनेत आधुनिक विज्ञानाच्या मर्यादांना तर तोडच नाही. आजचे संशोधन उद्या पालटते, पुढचा शोध लागतो. आज जगभर डार्विन सिद्धांताची केवढी मोठी फजिती होत आहे, त्यावरून तरी संशोधकांनी भारतीय द्रष्ट्या ऋषिमुनींच्या शोधांचे महत्त्व जाणले पाहिजे; पण हिंदुद्वेषाचाच चष्मा घालून बुद्धीवाद्यांच्या मंचावर संशोधक व्याखाने देत राहिले, तर ते अधिकच हास्यास्पद होते. यातून समाजाचे प्रबोधन नव्हे, दिशाभूल करत स्वतःलाही ते फसवत आहेत, हे संशोधकांनी समजून घेतले पाहिजे. देश-विदेशातील काही संशोधकांनी अध्यात्माचे नियम समजून घेतले आहेत, ते जिज्ञासेने प्राचीन संशोधनाकडे पहातात आणि प्रतिदिन त्यांना त्यात नवनवीन अर्थ सापडतात. संगणकतज्ञ डॉ. विजय भटकर हे याचे उत्तम उदाहरण आहेत. जर्मनी, अमेरिका, इंग्लंड आदी देशातील शास्त्रज्ञांनी भारताचे प्राचीन ग्रंथ वाचण्यासाठी संस्कृतचा अभ्यास केला. न्यूटन म्हणत असे की, माझे संशोधन मोठ्या महापुरुषांनी सांगितलेल्या सूत्रांच्या पायावर उभे आहे. याचाच अर्थ प्राचीन संशोधनाचा पाया नाकारून चालत नाही. एक पाया असतो, तेव्हा पुढचा शोध लागतो. आईनस्टाईनने सांगितले, ‘भारतियांनी शून्याचा शोध लावला म्हणून आपण पुढचे संशोधन करू शकलो.’ आर्यभट्टांच्या पूर्वीही प्राचीन श्लोकांत ‘१८ अक्षौहिणी’ सैन्य, ‘१८ पद्म’ वानरसेना’ आदी अक्षरांच्या स्वरूपात उल्लेख होतेच. या मोठ्या पार्श्वभूमीवर आकड्याच्या स्वरूपात आर्यभट्ट ‘०’ मांडू शकले. हे लक्षात घेतले पाहिजे. तळपदे यांनी केलेले वेदाधारित संशोधन इंग्रजांनी दाबले आणि राईट बंधूंच्या नावावर विमानाचे संशोधन गेले. हे तरी भारतीय संशोधनाला नावे ठेवणार्‍यांनी लक्षात घेतले पाहिजे. ‘नासा’त संस्कृतचा अभ्यास का केला जात आहे ? आज ज्या कृष्णविवराने शास्त्रज्ञांना पछाडले आहे, त्याचे उल्लेख वेदांमध्ये आहेत. अमावास्या-पौर्णिमेवर आधारित भारतीय पंचांग आणि कालगणना खगोलशास्त्रीयदृष्ट्या इतकी परिपूर्ण आहे की, विदेशी ‘कॅलेंडर’ काढणार्‍यांची बोबडी वळते; कारण त्यांनी मासांचे दिवस कमी-अधिक करण्याचा घोळ घालून ठेवलेला आहे. जहाजे, स्थापत्य, विणकाम, औषधे आणि शल्यचिकित्सा, ज्योतिष, धातूकाम आदी संशोधन विषयांना तोटाच नाही; कारण भारतीय संस्कृती परिपूर्ण विकसित आणि विश्वव्यापी होती. हिंदुद्वेषाची झापडे ओढलेल्या अंधश्रद्धाळू अंनिसला हे काय कळणार ?