हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधामुळे भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या महासभेत होणारा अत्याधुनिक पशूवधगृहाचा विषय स्थगित !

अवैध पशूवधगृहाला विरोध करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन !

ठाणे, १० मे (वार्ता.) – भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. ७ येथील इदगाह रस्ता भागात अत्याधुनिक पशूवधगृह बीओटी तत्त्वावर चालू करण्याचे नियोजन आहे. त्याच्या निविदा मागवण्यासाठी महासभेची मान्यता मिळणे आवश्यक आहे. महानगरपालिकेच्या सचिव कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या पूरक विषयपत्रिकेत हा प्रस्ताव नमूद केला होता; मात्र पशूवधृगह अवैध असल्याचे सांगत येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, नागरिक आणि प्राणीमित्र संघटना यांनी त्याला विरोध दर्शवला होता. हा विरोध पहाता महासभेत घेण्यात येणारा विषय स्थगित केला असल्याचे महापौर प्रतिभा पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

‘महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन कायदा १९४९ चे कलम ६३ आणि ६६ मधील तरतुदी यात समाविष्ट नसून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ओक आणि न्यायमूर्ती श्रीमती कंकनवाडी यांच्या खंडपिठाने याविषयी योग्य दिशादर्शन केले आहे; परंतु महानगरपालिका त्यांनी दिलेल्या दिशानिर्देशाचे उल्लंघन करत आहे’, असे भारतीय गोवंश रक्षण संवर्धन परिषदेने खासदार कपिल पाटील यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

‘पशूवधगृह बीओटी तत्त्वावर चालवण्यासाठी दिल्यास नफा मिळवण्यासाठी अयोग्य मार्गाने कत्तल होऊ शकते. त्याचा आसपासच्या परिसरातील शेती उपयोगी गोवंशियांवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती नगारिकांनी व्यक्त केली आहे.

पशूवधगृहापेक्षा शहरातील समस्या सोडवण्याला प्राधान्य द्यावे ! – महेश चौघुले, आमदार, भाजप

महेश चौघुले

शहरातील पाणी, रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधा जनतेला पुरवण्यासाठी भिवंडी निजामपुरा महानगरपालिकेकडे पैसे अल्प आहेत, तर काही प्रमाणात ८.२५ कोटी रुपये व्यय करून अत्याधुनिक पशूवधगृह उभारण्याचा घाट कशासाठी ? या पशूवधगृहात मोठ्या प्रमाणात कत्तल होऊन भिवंडी हे आखाती देशांना मांस पुरवणारे केंद्र म्हणून उदयास येईल. यापूर्वीही भिवंडी येथे पशूवधगृहांना मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. या विषयामुळे शहरातील नागरिकांमध्ये असंतोष असून याचा उद्रेक होण्याची भीती आहे. पशूवधगृहाला आमचा विरोध असून हा विषय स्थगित करण्यात यावा, अशी मागणी पालिकेच्या आयुक्तांकडे आम्ही केली आहे.

अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल ! – नीलेश चौधरी, नगरसेवक, भाजप

नीलेश चौधरी

भिवंडीमध्ये मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाला असतांना हा विषय महासभेत घेऊन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. भिवंडी शहरात कोणत्याही स्वरूपाचे पशूवधगृह होता कामा नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.