राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्याविरोधात अटक वॉरंट !

प्रभाकर घार्गे

सातारा, ९ मे (वार्ता.) – पडळ (जिल्हा सातारा) येथील साखर कारखान्यावर एका अधिकार्‍याला मारहाण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी प्रविष्ट केलेला मुदतवाढीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला असून त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढले आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक डॉ. नीलेश देशमुख यांनी दिली.

पडळ येथील हत्येच्या तपासासाठी वडूज पोलिसात ७ ते ८ जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. या गुन्ह्यातील संशयीत माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज प्रविष्ट केला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशाने आमदार घार्गे २९ एप्रिल या दिवशी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात उपस्थित झाले होते. न्यायालयाने त्यांना ६ मेपर्यंत दिलासा देऊन ७ मे या दिवशी न्यायालयात उपस्थित रहाण्याचे आदेश दिले होते; मात्र घार्गे यांनी उपस्थित न रहाता मुदतवाढीसाठी अर्ज दिला. तो अर्ज न्यायालयाने फेटाळून त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढले.