राष्ट्रपुरुष आणि मुख्यमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींची अपकीर्ती केल्याप्रकरणी पुणे येथील सायबर पोलिसांकडे गुन्हा नोंद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

पुणे – राष्ट्रपुरुष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सामाजिक माध्यमावर अपकीर्ती केल्याप्रकरणी शिवसेनेच्या नेत्यांनी, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील युवासेना उपाध्यक्ष आकाश शिंदे यांनी पुण्यातील सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. पुणे शहरातील शिवसेना उपशहरप्रमुख किरळ साळी यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. या तक्रारीची नोंद घेत नाना पंडीत, वैभव पाटील यांच्यासह ११ जणांविरोधात आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

‘राजकारण महाराष्ट्राचे’ नावाचे फेसबूक पेज, ‘इंटलेक्च्युअल फोरम’ हा ‘व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप’, ‘कोमट बॉइज अ‍ॅण्ड गर्ल्स फेसबूक ग्रुप’ आणि ‘सी.एम्. देवेंद्र फडणवीस फॅन क्लब’ नावाचे ‘फेसबूक पेज’, तसेच ट्विटरसारख्या समाजमाध्यमांवर अपकीर्ती करणारे लिखाण होते. ‘स्वरुप भोसले नावाच्या व्यक्तीने राष्ट्रपुरुषांच्या नावानेही अवमानकारक मजकूर पोस्ट केला होता’, असे तक्रारीत म्हटले आहे.