आमदार संजय शिरसाट यांच्यावर कोणती कलमे लावली ?

  • लोकांची गर्दी जमवल्याप्रकरणी संभाजीनगर खंडपिठाची विचारणा

  • आमदार शिरसाट यांच्यावर गुन्हा नोंद

औरंगाबाद खंडपीठ

कोरोनाचे संकट गडद होत असतांना लोकप्रतिनिधींनी याचे भान ठेवून सार्वजनिक गर्दीचे कार्यक्रम टाळावेत !

संभाजनीगर – २५ एप्रिल या दिवशी येथील शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी कोरोनाचे निर्बंध डावलून आमदार निधीतून करण्यात येणार्‍या कामाचे भूमीपूजन केले होते. शहरात कोरोनामुळे प्रतिदिन २५ हून अधिक नागरिक स्वतःचे प्राण गमावत आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोेठ्या प्रमाणावर वाढत असतांना गर्दी जमवणार्‍या शिरसाट यांच्यावर कोणत्या स्वरूपाचे गुन्हे नोंद केले आहेत?, अशी विचारणा येथील खंडपिठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती बी.यू. देबडवार यांनी ३ मे या दिवशी प्रशासनाकडे केली. जर गुन्हा नोंद केला असेल, तर कोणती कलमे लावली आहेत ?, याची माहिती देण्याचे आदेशही खंडपिठाने दिले आहेत. शहरात मास्क आणि शिरस्त्राण (हेल्मेट)चा वापर होत आहे काय ? जे लोक या नियमांचे पालन करत नाहीत त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली, अशी विचारणाही न्यायालयाने केली आहे.

संचारबंदीत भूमिपूजन करताना शिवसेना आमदार संजय शिरसाट (डावीकडे)

माध्यमांमध्ये कोरोनाविषयी आलेल्या वृत्तांची नोंद घेऊन खंडपिठाने सुमोटो (स्वत:हून याचिका प्रविष्ट करणे) फौजदारी याचिका प्रविष्ट करून घेतली आहे. यापूर्वीच्या सुनावणीत खंडपिठाने नियम न पाळणार्‍या नागरिकांना सुनावले होते, तसेच रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार आणि इतर सुविधा यांविषयी प्रशासनाला जाब विचारला. कार्यक्षेत्रातील जिल्ह्यांकडून उपाययोजनांची माहिती खंडपिठाने मागवली आहे. शिरसाट यांच्यासह ४० जणांवर २६ एप्रिल या दिवशी वाळूज एम्.आय.डी.सी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान संहिता कलम २६९, २७०, १८८, १३५ नुसार हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यात आरोप सिद्ध झाल्यास २ वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.