पुणे येथे लसीकरण केंद्रावरच नाव नोंदणीसाठी नागरिकांची गर्दी !

पुणे, ३ मे – राज्यात १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांना कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा १ मे पासून आरंभ झाला आहे. लस घेण्यासाठी नागरिकांनी कोविन पोर्टलवर नोंदणी केली; मात्र हे पोर्टल व्यवस्थित कार्य करीत नसल्याने नागरिकांनी लस घेण्यासाठी नोंदणीकृत केंद्रांवर मोठी गर्दी केली. यामुळे केंद्रावरच कोरोना नियमांचा बोजवारा उडत असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. (लसीकरणाची मोहीम राबवण्यापूर्वी मूलभूत गोष्टींची पूर्तता प्रशासनाने करून नागरिकांची गैरसोय टाळणे आवश्यक आहे. – संपादक)

लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर, तसेच राजगुरुनगर येथील केंद्रावर तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनी लस घेण्यासाठी गर्दी केली होती; मात्र प्रत्येक केंद्रावर केवळ १०० जणांना प्रतिदिन लस देता येत आहे; पण लोणी काळभोर येथे २५० ते ३०० नागरिकांनी सकाळपासून गर्दी केली होती. लोणी काळभोर येथील केंद्रावर जागा अपुरी असल्याने ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अथवा एखाद्या हायस्कूलमध्ये लसीकरणाचे नियोजन केले, तर कोरोना नियमांचे पालन सहज शक्य होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.