घरी विलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधित रुग्णावरील उपचारासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्षाची निर्मिती करावी ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – सौम्य लक्षणे असलेल्या आणि घरी विलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना वेळीच योग्य ते उपचार मिळून त्यांचे प्राण वाचावेत, यासाठी एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष निर्माण करण्यात यावा. या कक्षामध्ये ज्येष्ठ आणि निवृत्त डॉक्टर यांची नियुक्ती करून त्यांच्याकडे रुग्णांच्या संपर्काचे दायित्व द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरक्षेत्रासह पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांना केले आहे. १ मे या दिवशी उद्धव ठाकरे यांनी वरील महानगरपालिकेच्या आयुक्तांसमवेत ‘ऑनलाईन’ संवाद साधतांना वरील सूचना दिली. या वेळी आयुक्तांशी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘कोरोनाच्या तिसर्‍या संभाव्य लाटेत लहान मुलांमध्येही मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग आढळण्याची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी बोलून दाखवली आहे. याविषयी प्रशासनाने पूर्व नियोजन करून ठेवावे. प्रत्येक पालिकाक्षेत्रात येणार्‍या काही दिवसांत ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध झालीच पाहिजे. त्यासाठी कुणावरही अवलंबून रहाण्याची आवश्यकता राहू नये. कोरोनाच्या विरोधात लढा देतांना अन्य रोगांच्या रुग्णांना सुद्धा वेळीच उपचार मिळणे अतिशय आवश्यक आहे.