|
नंदुरबार – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रामनवमी ते हनुमान जयंती या कालावधीत ‘ऑनलाईन बलोपासना सप्ताह’चे आयोजन करण्यात आले होते. युवक-युवतींमध्ये देशाभिमान जागृत व्हावा, तसेच श्रीराम आणि हनुमान यांची भक्ती करून स्वतःत भक्तीभाव निर्माण व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात येत आहे. या उपक्रमाला राष्ट्र-धर्म प्रेमी युवांचा वाढता प्रतिसाद मिळाला. नंदुरबार शहर आणि जिल्ह्यातून ऑनलाईन प्रणालीद्वारे प्रतिदिन सकाळी ६ ते ७ या वेळेत बलोपासना वर्गामध्ये प्रारंभी श्रीरामाचा सामूहिक नामजप घेतला जातो. त्यानंतर व्यायामप्रकार, श्रीरामाच्या जीवनातील बोधप्रद प्रसंगाचे श्रवण, शारीरिक सराव, हनुमंताच्या जीवनातील बोधप्रद प्रसंगांचे श्रवण आणि शेवटी हनुमंताचा नामजप अशा क्रमाने वर्गाचे स्वरूप असते. बलोपासना वर्गामुळे एकाग्रता वाढणे, आत्मविश्वास निर्माण होणे, शारीरिक क्षमता विकसित होणे, गुणवृद्धी होणे असे अनेक लाभ होत असल्याचे युवक-युवतींच्या लक्षात आले.
‘काळानुसार साधना’ या साधनेतील तत्त्वाला अनुसरून आज कोरोना संक्रमणाचे संकट आणि ताणतणावाने भरलेल्या जीवनात बलोपासनेतून होणार्या साधनेची पुष्कळ आवश्यकता आहे. बलोपासनेचे महत्त्व समाजमनावर बिंबवायला हवे, यासाठी हे वर्ग घेतले जात आहेत. हिंदूसंघटन, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती हे हिंदु जनजागृती समितीचे मुख्य कार्य आहे. ऑनलाईन धर्मशिक्षणवर्ग, बालसंस्कारवर्ग, धर्मसंवाद या माध्यमांतून धर्मप्रसाराचे कार्य चालू आहे. या सर्वच उपक्रमांना जिज्ञासूंचा दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत आहे.